भाजपचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यात लवकरच बैठका सुरू होतील. बूथ यंत्रणा, वॉर रुम यासह प्रदेश नेत्यांच्या निर्देशानुसार सर्व कामांचा आढावा घेण्यात येईल, असे भाजपचे साेलापूर लाेकसभा समन्वयक अमर साबळे यांनी सांगितले.
भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी नुकतीच अमर साबळे यांच्यावर सोपवली आहे. अमर साबळे यांनी २०१९ मध्ये सोलापुरातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पक्षाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना संधी दिली. डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय वादात सापडला आहे. त्यामुळे लोकसभेसाठी नव्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे भाजपचे नेते सांगतात.अमर साबळे हे भाजपचे सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे निकटवर्तीय आहेत. देशमुख आणि कल्याणशेट्टी यांच्या मागणीमुळेच प्रदेश भाजपने साबळे यांच्यावर सोलापूर लोकसभेची जबाबदारी सोपिवल्याची चर्चा सोलापुरात आहे. दुसरीकडे भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाकडून सध्या पुण्यातील भाजप नेते दिलीप कांबळे यांचे नाव पुढे आणले जात आहे. भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू होईल, असे साबळे यांचे म्हणणे आहे.