बार्शी – शहरातील मांगडे चाळ परिसरात महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आकाश बापू घोडके (रा. रामेश्वर मंदिर, कुर्दुवाडी रोड, बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी पीडित महिला या घरकाम करुन उदरनिर्वाह करत असून, त्यांच्या शेजारीच त्यांची बहीण राहते. दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी असताना आकाश घोडके हा अचानक घरात घुसला आणि ‘तुझ्या बहिणीला समजावून सांग,’ असे म्हणत फिर्यादीच्या अंगावरील साडी ओढली व ढकलले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी आरडाओरडा करत घराबाहेर पळाल्या असता, कार्तिक पवार आणि राहुल आलमलकर हे तेथे आले व त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आकाश घोडके हा घटनास्थळावरुन पळून गेला.
फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकारामुळे त्यांच्या मनास लज्जा व भीती निर्माण झाली असून, बार्शी शहर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


















