सोलापूर : पत्रकारितेच्या स्थित्यंतराच्या काळात अनेक बदल होत असले तरी पत्रकारितेचा गाभा तोच राहणार आहे. वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचे व्रत घेतलेला व्रतस्थ पत्रकार म्हणजे सामाजिक मूल्यांचा राखणदार असतो, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे) येथील विद्यमान अधिष्ठाता आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे) येथील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. उज्वला बर्वे यांनी केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे देण्यात येणारा कल्पतरुकार कै. ल. गो. काकडे स्मृति पुरस्कार गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे यांना डॉ. बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रविंद्र चिंचोलकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह प्रमोद जोशी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे यांना सन्मानचिन्ह, शाल, नॅपकिन बुके आणि पाच हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर डॉ. उज्वला बर्वे यांचे ‘ पत्रकारिता – कालची, आजची आणि उद्याची’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बर्वे म्हणाल्या, पत्रकारिता हे क्षेत्रच जनतेच्या हिताकरिता आहे. राष्ट्रउभारणीच्या काळात पत्रकारितेचे योगदान मोठे आहे. १९९१, २००० सालानंतर पत्रकारितेला वेगळे आयाम मिळाले. वसा, व्यवसाय आणि व्यापार असे वेगवेगळे तीन टप्पे पत्रकारितेत दिसून येतात. भारतात वाढलेल्या साक्षरतेमुळे वाचकांची संख्याही मोठ्या संख्येने वाढली आहे. सगळ्यात आधी बातमी देण्याच्या स्पर्धेमुळे पत्रकारिता क्षेत्रात चुरस वाढली आहे. परंतु अशावेळीदेखील आशयनिर्मिती करणाऱ्यांनी समाजहिताचे भान राखून बातम्या दिल्या पाहिजेत. समाजसेवा आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांची सांगड घालून पत्रकारिता करणे ही आजच्या पत्रकारितेची जणू अपरिहार्यता बनली आहे, असेही अधिष्ठाता डॉ. उज्वला बर्वे यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘राजकारण व पत्रकारिता’ या विषयावरील ग्रंथलेखनाबद्दल रवींद्र चिंचोलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विजयकुमार देशपांडे म्हणाले, पत्रकारितेची आयुधे बदलत असली तरी पत्रकारितेचा मूळ आशय आणि उद्दिष्ट तेच आहे. पत्रकारितेसमोर दररोज वेगवेगळी आव्हाने येत आहेत. सोशल मीडियाच्या काळात घडलेल्या घटनेचे तटस्थ विश्लेषण करून बातमीदारी करण्याची सध्या आवश्यकता आहे, असेही श्री. देशपांडे याप्रसंगी म्हणाले.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक
संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. युवा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा तर सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. तसेच उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये यांनी पुरस्कारप्राप्त विजयकुमार देशपांडे यांचा परिचय करून दिला. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, युवा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, सहकार्यवाह प्रा. किरण कुलकर्णी, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर,सल्लागार अॅड. अनिल काकडे, मंगला चिंचोळकर,.संजय कुलकर्णी..आदी उपस्थित होते.
————–
वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज
वर्तमानपत्र हे जगातील एकमेव उत्पादन असे आहे की जे उत्पादन किमतीपेक्षा कमी किमतीला विकले जाते. वाचकांना कमीत कमी रकमेत जास्तीत जास्त चांगला मजकूर देण्याचा वर्तमानपत्रांचा प्रयत्न असतो. त्यामुळे जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र चालू आणि जगू शकत नाही हे वास्तव वाचकांनी समजून घेण्याची गरज आहे, असेही डॉ. उज्वला बर्वे याप्रसंगी म्हणाल्या.

























