नांदेड / हदगाव – हदगाव शहरातून ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू च्या मूर्तीची शोभायात्रा बँड पथक भजनी मंडळ २१ घोडे व हदगाव तालुक्यातील महंत – संत भगव्या पताका व ध्वज अशी भव्य दिव्य मिरवणूक हदगाव शहरातून सकाळी ११ वाजता शिव पार्वती मंगल कार्यालयातून निघून पूर्ण हदगाव शहरातून शोभा यात्रेचे दत्तबर्डी देवस्थान येथे विसर्जन झाले.
या शोभायात्रीत हदगाव तालुक्यातील आ. बाबुराव कोहळीकर, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यासह हदगाव तालुक्यातील हजारोचा जनसमुदाय या शोभायात्रेत होता.
या शोभायात्रेत आर्य समाजाच्या वतीने पाणी व फळाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्याचे दैवत असलेल्या श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथील प्रसिद्ध मंदिरात श्री श्री १००८ महंत श्रीगोपाळगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली दत्त मूर्तीचा जिर्णोद्धार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त दिनांक २९ ऑक्टोबर रोजी बुधवारपासून दत्तनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे.
हदगाव शहरालगत दत्तबर्डीच्या टेकडीवर श्री दत्तात्रयाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षाची परंपरा आहे. दत्तात्रयांचे हे मोठे घर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी बनवलेली मूर्ती आहे या मूर्तीला बदलण्याची गरज असल्याचे सर्व भक्त गणांच्या आणि खुद्द श्री श्री १००८ महंत महाराजांच्या लक्षात आले. त्यासाठी दत्त भक्तांची बैठक घेऊन सर्वांच्या सहयोगाने महंत श्रीगोपाळगिरी महाराजांनी ४१ किलो चांदीची मूर्ती बसवण्याचा संकल्प केला. त्यासाठी सर्व दत्त भक्तांनी सढळ हस्ताने देणगी सुद्धा दिली. एक दत्त भक्त श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी मूर्तीसाठी मोलाचा हातभार लावला. दत्त भक्तांनी गावागावातून वर्गणी करून या मूर्तीसाठी देणगी दिली तर काही दत्तभक्तांनी पाच हजार, अकरा हजार, एकेविस हजार ते एक लाख, सव्वा लाख रुपये पर्यंत देणगी दिली. सर्व दत्त भक्तांच्या देणगीतून ही ४१ किलो चांदीची मूर्ती बनवण्यात आली असून जुन्या मुर्तीच्या ठिकाणी तिची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा येत्या ०५ नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येणार आहे.
या दत्त मूर्तीच्या जिर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त दि. २९ ऑक्टोबर रोजी बुधवार पासून दत्त नाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासूनच हदगांव शहराजवळ दत्तबर्डी संस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये दुरवरून येणारे दत्तभक्त या सप्ताह निमित्त सात दिवस हदगावांत दत्तभक्तीत लिन होतांना दिसत आहेत या सप्ताह निमित्त येणाऱ्या दत्त भक्तांच्या राहण्याची व महाप्रसाद रुपाने भोजनाची सर्व व्यवस्था सातही दिवस हदगांव परिसरातील वेगवेगळ्या गावच्या भक्तमंडळी कडून करण्यात येत आहे. तर हडसणी येथील गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मुर्ती स्थापनेच्या दिवशी श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख रा. ढोकी ता. जिल्हा धाराशिव आणि कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
माजी खा. वानखेडे व आ. कोहळीकर
दत्त बर्डीच्या टेकडीवर असलेल्या दत्तात्रयाचे जागृत देवस्थान असून पुरातन मंदिर आहे या मंदिराला शेकडो वर्षाची परंपरा लाभली असून याच ठिकाणी ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू च्या मूर्तीचा जीर्णोद्धार सोहळा आयोजित केला असून हा क्षण ऐतिहासिक असून या क्षणाचे आपण साक्षीदार व्हा असे अवाहन माजी खासदार सुभाष वानखेडे व आमदार कोहळीकर यांनी दत्तभक्तांना केले आहे.




















