वेळापूर – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वेळापूर गावात जनजागृती रथाचे पालखी मैदान येथे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी सरपंच रजनीश बनसोडे यांच्या हस्ते रथाचे पूजन करून अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच रजनीश बनसोडे म्हणाले की “महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली आहे.
लोकसहभाग व श्रमदानातून विकासाची गती वाढवणे, सुशासनयुक्त व सक्षम ग्रामपंचायत घडवणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर शासकीय योजनांचा प्रभावी अभिसरण करून प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचवणे, गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणे तसेच उपजीविका विकास व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या अभियानात वेळापूर गावाने सक्रिय सहभाग नोंदवावा, प्रत्येक नागरिकाने स्वच्छता, पाणी संवर्धन, हरित गाव आणि सामाजिक सलोखा यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच ग्रामस्थांच्या
सहकार्याने वेळापूरला आदर्श व समृद्ध गाव बनवूया.
आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध महाराष्ट्र घडविण्यात आपले योगदान द्यावे,” असे आवाहन सरपंच रजनीश बनसोडे यांनी केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच नानासो मुंगूसकर, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे, लक्ष करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष धनराज सावंत, ग्रामपंचायत सदस्य अमृतराव माने देशमुख, बिभिषन मुंगूसकर, किरण काळे, सूर्याजी माने देशमुख, उदय माने देशमुख, साकिब मुलाणी, अरबाज कोरबू, अमोल साळवी, रशीद दरवेशी तसेच ग्रामपंचायत सदस्य, अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी हातात खराटा घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.

























