वैराग : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी राजकीय बुद्धीबळावर आपला दबदबा सिद्ध केला आहे. आमदार दिलीप सोपल पुरस्कृत ‘बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी’ आणि माजी सभापती संजय सोपल-बारबोले गटाला ‘दे धक्का’ देत राऊत यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा विकास आघाडी’ ने १८ पैकी १८ जागा जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. हा विजय म्हणजे बाजार समितीवर राऊत गटाच्या सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ ठरली आहे.
लक्षवेधी लढत आणि विक्रमी उत्साह
नगरपालिका निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल यांच्या गटात ही लढाई अत्यंत चुरशीची ठरली. रविवार, ७ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात शेतकऱ्यांनी आणि मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत ९६.४८ टक्के एवढे विक्रमी मतदान केले.
आज (सोमवार, ८ डिसेंबर) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या क्षणापासूनच राऊत गटाच्या बाजूने कौल येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.’बळीराजा विकास आघाडी’चा १८/१८ क्लीन स्वीप
१८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातील २ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १६ जागांसाठी झालेल्या मतदानात राऊत गटाच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
बळीराजा विकास आघाडीचा निकाल १०० टक्के स्ट्राइक रेट राखत राऊत गटाने बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली, ज्यामुळे विरोधकांचे ‘परिवर्तन’ करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
विधानसभा पराभवानंतर ‘गुलाल’ची परतफेड
काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या राजेंद्र राऊत यांच्यासाठी बाजार समितीचा हा विजय कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. हा केवळ बाजार समितीचा विजय नसून, बार्शीच्या ग्रामीण आणि सहकारी राजकारणावर राऊत गटाचे असलेले अटल वर्चस्व सिद्ध करणारा आहे.
वैराग भागातील कार्यकर्त्यांनी हा विजय एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर, नगरसेवक वैजिनाथ आदमाने, अरुण सावंत, मेजर जगन्नाथ आदमाने, बाबासाहेब रेड्डी यांच्यासह असंख्य समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
सभापती कोण? वैराग की बार्शी?
बाजार समितीवर एकहाती सत्ता आल्यानंतर आता पुढील पाऊल म्हणजे सभापती आणि उपसभापतीपदाची निवड. याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गत पाच वर्षे बाजार समितीचे यशस्वी सभापतीपद सांभाळलेले रणवीर राऊत यांना यंदा निवडणुकीत उमेदवार म्हणून बाजूला ठेवून त्यांच्यावर संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
राऊत समर्थकांमध्ये सभापतीपदासाठी वैराग आणि बार्शी या दोन्ही भागातून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
राजकीय समतोल साधण्यासाठी, बार्शीला सभापतीपद देऊन वैरागला उपसभापतीपद देणार की उलटफेर होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हा भव्य विजय साजरा झाल्यानंतर राजेंद्र राऊत हे कोणाच्या माथी सभापतीपदाचा ‘गुलाल’ लावतात, यावर आता तालुक्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.


























