सोलापूर – ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष यांची सांगड घालत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर यांनी पुन्हा एकदा आपल्या संशोधनक्षमतेची ठोस छाप राष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे. संस्थेच्या नावावर “ग्रॅव्हिटी-ड्रिव्हन ऑटोनॉमस सोलर पॅनेल ओरिएंटेशन सिस्टीम विदाऊट इलेक्ट्रिकल कॉम्पोनन्ट्स” या अत्यंत अभिनव आणि पर्यावरणपूरक संकल्पनेसाठी अधिकृत पेटंट दाखल झाला आहे, ही बाब सोलापुरच्या अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.
सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूर्याच्या दिशेनुसार सौर पॅनेल फिरवणे ही आजची गरज आहे. मात्र, सध्या वापरल्या जाणाऱ्या प्रणालींमध्ये विद्युत मोटर्स, सेन्सर्स, कंट्रोल सिस्टीम्स आणि सतत ऊर्जेची आवश्यकता भासते. यामुळे खर्च, देखभाल आणि तांत्रिक गुंतागुंत वाढते. या पार्श्वभूमीवर डब्ल्यू.आय.टी. ने मांडलेली ही संकल्पना अत्यंत वेगळी आणि दूरदृष्टीची आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करून, कोणतेही विद्युत घटक न वापरता सौर पॅनेल आपोआप सूर्याच्या दिशेने वळवणे, ही कल्पना केवळ वैज्ञानिक नव्हे, तर शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरणारी आहे.
या शोधाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे शून्य वीज वापर, कमी देखभाल खर्च, ग्रामीण व दुर्गम भागांसाठी उपयुक्तता, दीर्घकालीन टिकाऊपणा, हरित ऊर्जेला चालना. विद्युत घटकांशिवाय कार्य करणारी ही प्रणाली भविष्यात सौरऊर्जेच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकते. विशेषतः शेतकरी, ग्रामीण व आदिवासी भाग, तसेच विकसनशील देशांसाठी ही प्रणाली वरदान ठरू शकते.
हा पेटंट स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) या क्षेत्राशी संबंधित असून, मूलभूत वैज्ञानिक तत्त्वांचा समाजहितासाठी कसा प्रभावी उपयोग करता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. संशोधन केवळ प्रयोगशाळेत मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरावे, हीच खरी संशोधनाची फलश्रुती आहे आणि ती या संकल्पनेतून स्पष्टपणे दिसून येते. या पेटंट मुळे , देशातील सौरऊर्जा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होईल. स्वदेशी तंत्रज्ञान, कमी खर्चात जास्त कार्यक्षमता आणि पर्यावरण रक्षण या त्रिसूत्रीवर आधारित ही संकल्पना आत्मनिर्भर भारत आणि हरित भारत या संकल्पनांना अधिक बळ देणारी ठरेल.
यासाठी डब्ल्यू.आय.टी.चे संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. श्रीशैलप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. महेश कल्याणशेट्टी, डॉ. भाग्येश देशमुख, डॉ. श्रीकृष्ण गोसावी, प्रा. गोविंद सामलेटी, प्रा. मयूर उबाळे, प्रशांत धनशेट्टी, डॉ. नागेश तंबाके, प्रा. दीपक मसलेकर, प्रा. बिपीन पाटील यांचे योगदान आहे. या सर्वांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. विजय आठवले आणि प्राध्यपक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंद केले आहे.
























