अपघाताची माहिती समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, आदी अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प येथील घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली.
नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने (वय ४३) यांचे अपघातात निधन झाले आहे. लष्करी वाहनाचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सोनोने हे त्यांच्या सीबीझेड दुचाकीवरुन (एमएच १५-सीवाय ४०१४) देवळाली कॅम्पच्या लष्करी हद्द परिसरातील डेअरी फार्ममार्गे कर्तव्यावरून घरी जात होते. त्यांच्या दुचाकीला देवळाली कॅम्प परिसरातील वडनेर रोडजवळ असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या वाहनाचा धक्का लागला. धक्का लागल्याने देवळाली पोलीस स्थानकांत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधिकारी कुंदन सोनोने यांचा अपघात झाला. यावेळी तात्काळ त्यांना लष्करी जवानांनी लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी सोनोने यांना तपासून मयत घोषित केले. अपघातात सोनोने यांच्या छाती व पायाला गंभीर जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, देवळाली पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह नाशिक शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
अपघाताची माहिती समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, आदी अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प येथील घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सोनोने यांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या वाहनाच्या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत त्यामध्ये वाहनाच्या पुढील चाकाखाली दुचाकी आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.