गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजीने व्यवहार होत आहे. गेल्या एक महिन्यात एलआयसी शेअर्सनी ३० टक्क्यांनी वाढले आहेत तर सहा महिन्यात २४ टक्के आणि एका वर्षात १६ टक्क्यांनी झेप घेतली आहे. देशांतर्गत बाजारात पडझड होत असली तरी यादरम्यान एलआयसीचे शेअर्स ७% उसळीसह व्यवहार करत असून या तेजीच्या बळावर एलआयसीचे शेअर्स नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) शेअर्समध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने तेजी दिसत आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली असून एलआयसीचे शेअर ७% वाढीसह ८२०.०५ रुपयांवर पोहोचले आहेत जे विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या शेअर्ससाठी ५२ आठवड्यांची नवीन उच्च पातळी आहे. एलआयसीचा शेअर गुरुवारी ७६४.५५ रुपयांवर बंद झाला होता. नुकतेच केंद्र सरकारने मोठी सवलत दिल्यानंतर विमा कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ झाली आहे. यासह एलआयसीचे बाजार भांडवल पाच लाख कोटींच्या पुढे गेले आहे.
सरकारकडून मोठा दिलासा
सरकारी विमा कंपनी एलआयसीने माहिती दिली की, सरकारने २५% किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (MPS) नियमांची पूर्तता करण्यासाठी एक वेळची सूट दिली आहे. आता विमा कंपनी शेअर्सच्या लिस्टिंगच्या तारखेपासून १० वर्षांच्या आत किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग पूर्ण करू शकते. बाजार नियामकच्या (सेबी) नियमांनुसार कोणत्याही कंपनीने २५% सार्वजनिक शेअरहोल्डिंगचे किमान निकष शेअर लिस्टेड केल्याच्या तीन वर्षांच्या आत किंवा विलीनीकरण/अधिग्रहणानंतर एक वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते.
विमा कंपनीचे शेअर्सचे किती रुपयांना वाटप
सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओचा किंमत बँड ९०२ ते ९४९ रुपये निश्चित करण्यात आला होता तर आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स ९४९ रुपयांना वाटप झाले. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) १७ मे २०२२ रोजी ८६७.२० रुपयांना तर राष्ट्रीय शेअर बाजारावर ८७२ रुपयांवर लिस्टिंग झाले. अशा प्रकारे लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.
LIC शेअर्सची कामगिरी
विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स अजूनही त्यांच्या आय़पीओ किमतीच्या सवलतीवर व्यवहार करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत LIC चे शेअर्स सुमारे ३५% वाढले आहेत. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी विमा कंपनीचे शेअर्स ६०४.९५ रुपयांवर होते तर आज २२ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या शेअर्सनी ८२०.०५ रुपयांवर मजल मारली जो विमा कंपनीचा ५२ आठवड्याचा उच्चांक आहे तर ५२ आठवड्याचा नीचांक ५३०.२० रुपये आहे.