सोलापूर : शहरातील रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर महापालिकेकडून कारवाई होणार आहे. याबाबत संबंधित वाहनमालकांना नोटीसा काढण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिले.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पद्मशाली चौक, बालाजी मंदिरमागील परिसर, कुचननगर नाला, दत्तनगर,तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा वाहनधारकांना नोटिस देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले.
पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तत्काळ काढून टाकावे, हवामान केंद्र ते स्व. लिंगराज वल्याळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत, झुडपे, आजोरा तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी त्यांनी मार्कंडेय उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरातील स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.
या पाहणीवेळी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
वल्याळ क्रीडांगणातील ओपन जिमची होणार दुरुस्ती –
आयुक्तांनी स्व. लिंगराज राज वल्याळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करा तसेच कर्णिक नगर ते वालचंद कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते व चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्याचे आदेशही दिले. आयुक्तांनी मार्कंडेय जलतरण तलावालाही भेट देऊन पाहणी केली.