भोकरदन दि. 28
आखिल भारतीय बारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील बारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या काही मागण्या मागील अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित होत्या. वारंवार पाठपुरवठा करुनही सदर मागण्या मंजूर होत नव्हत्या. त्यामध्ये अंजनगाव सुर्जी जि.अमरावती येथे राष्ट्रसंत शिरोमणी श्री.रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करणे, बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रसंत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, बारी समाजाचे मुख्य पिक पान मळा, पान पिंपरी व मुसळी अशा औषधी पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लागवडीकरता अनुदान देणे, अवकाळी पावसामुळे पानमळे, पानपिंपरी व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देणे आदी मागण्यांचा सामावेश होता.
सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल भारतीय बारी समाज महासंघाने माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हयातील शेगांव येथे राज्यस्तरीय बारी समाज मेळावा घेवुन सदर मागण्या आपण राज्य सरकार यांच्याकडे समर्थपणे मांडून पूर्ण करून घ्याव्यात अशी आग्रही भूमीका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे मांडली होती. त्याच वेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सदर मागण्या राज्यसरकार यांच्याकडुन पूर्ण करुन घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे अश्वासन बारी समाजाच्या मेळाव्यात दिले होते.
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसिहीता लागु झाल्यामुळे सदर प्रकरणी निर्णय हाणे शक्य नव्हते.
परंतु लोकसभेच्या निवडणुका संपल्या नंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आखिल भारतीय बारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यासह सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेवुन सदर मागण्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्राधान्याने पूर्ण करण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने प्रतिसाद देत बारी समाजाची अत्यंत महत्वाची असलेली राष्ट्रसंत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची तातडणी पूर्ण करणार असल्याचे अश्वासन दिले.
आज सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी बारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
सदर मागणी मान्य झाल्यामुळे आखिल भारतीय बारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहे. बारी समाजाच्या दृष्टीकोणातुन अत्यंत महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण झाल्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्हा व महाराष्ट्रभरातील बारी समाजच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.