बार्शी – वर्षभर विद्यार्थी अभ्यासाला जुंपलेले असतात. सोबतच अनेक छोटे मोठे उपक्रम राबविले जातात. मात्र वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी उत्साहाचा परमोच्च क्षण असतो, असे मत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी व्यक्त केले.
शिवप्रभा शैक्षणिक संकुल, रुई ता.बार्शी येथील वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. ग्रामीण भागातील जगण्याचे अनुभव साहित्य व कलेसाठी पोषक ठरतात. त्यामुळे आपल्या मुलांना पालकांनी संस्कारासोबतच स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी प्रास्ताविक करताना संकुलातील गुणवत्ता आणि उपक्रमांचा आढावा घेऊन पालकांच्या अपेक्षेचा विचार करुन बदलत्या शैक्षणिक प्रवाहासाठी व्यवस्थापन सज्ज असल्याचे सांगितले.
संकुलातील विविध विभागातील आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस व नयनरम्य गाण्यांवर नृत्याभिनय केला.
पर्यावरण रक्षण नाटक, भारुडातून करमणुकीच्या माध्यमातून प्रबोधन केले. तर छावा नाटकातून शौर्याचा इतिहास रंगमंचावर सादर केला.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना श्रीमती अर्चना डिसले यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. शाब्दिक स्वागत करणाऱ्या सुहास ढेकणे यांच्यासोबत विजय जुनवनकर यांनी सूत्रसंचालन केले. तर पांडुरंग देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर जाधव, केंद्रप्रमुख शशिकांत चव्हाण, संस्था सचिव रवींद्र कापसे, मुख्याध्यापिका संध्याराणी अहिरे, माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, संभाजी भोसले, शरद जगदाळे, बाळासाहेब कापसे तसेच शिक्षक, परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















