सोलापूर – ज्येष्ठ विधिज्ञ कै. अँड. पी. डी. कुलकर्णी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कै. अँड. पी. डी. कुलकर्णी फौंडेशनतर्फे अँड. अभिजित इटकर व अँड. देवयानी किणगी यांना न्यायक्षेत्रातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाबद्दल “युवा विधिज्ञ पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम आज दि. 04/04/2026 रोजी दुपारी 2:00 वाजता सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अँड. प्राची कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. महेश अग्रवाल, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष अँड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अँड. रियाज शेख, सचिव अँड. बसवराज हिंगमिरे, सहसचिव अँड. मीरा सिंग तसेच सहाय्यक सरकारी वकील अँड. आनंद कुर्डुकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अँड. महेश अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 351 या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांना महत्त्वपूर्ण कायदेशीर माहिती दिली. तसेच सत्कारमूर्ती अँड. अभिजित इटकर व अँड. देवयानी किणगी यांनी मनोगत व्यक्त करत, मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व वकिलीक्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमास सोलापूर वकील संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

















