सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंतीनिमित्त संभाजी आरमार मोठया थाटात जयंती वेगवेगळ्या उपक्रमानी साजरी करत असते. यंदाही 19 फेब्रुवारी रोजी शाही पालखी सोहळा आयोजित केला आहे. याच्या नियोजनाची बैठक डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच पार पडली. याबैठकीत संभाजी आरमार शाही पालखी सोहळा प्रमुखपदी अर्जुन शिवसिंगवाले यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष पदी जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तराताई बरडे, कृष्णा सुरवसे यांच्या निवडीबद्दल यथोचित सत्कार देखील करण्यात आला. सहप्रमुख पदी ऍड. रमाकांत बापट यांची निवड करण्यात आली.
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाचे उद्धारकर्ते असून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत. महिला, शेतकरी, धर्म, अर्थ, संरक्षण आदी सर्वच क्षेत्रात शिवरायांनी केलेले काम अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी माणसाने शिवरायांची जयंती जल्लोषात साजरी केली पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे, नगरसेवक संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उद्योजक मनीष सुरवसे, ईन सोलापूर न्यूजचे संपादक समाधान वाघमोडे, कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड, आप्पासाहेब सावंत आदी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात मिटिंगची सांगता झाली.

























