तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : समकालीन काळामध्ये सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा, हे शिकणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही हे जरी खरे असले तरी याच्या मदतीने आपण आपली कार्यक्षमता निश्चितपणे वाढवू शकतो, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे महासंचालक डॉ. डॉ.मदनमोहन त्रिपाठी यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अप्लिकेशन्स ऑफ मशीन्स इंटेलिजियन्स अँड डेटा अनॅलिटीक्स’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात उदघाटन संपन्न झाले.
यावेळी, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्लीचे महासंचालक तथा कुलगुरू डॉ.मदनमोहन त्रिपाठी, कार्यकारी संचालक डॉ.जयराज किडव एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.एच.एच.शिंदे, प्राचार्या डॉ.विजया मुसांडे, संचालिका डॉ.शर्वरी तामणे, प्राध्यापक, संशोधक व आयटी क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित असणार आहेत. यावेळी, डॉ.त्रिपाठी यांनी ‘ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ मशीन इंटेलिजियन्स इन दि नेक्स्ट डिकेड विथ आर्टिफिशियल इन्टेलिजियन्स सेमीकंडक्टर रोडमॅप’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एमजीएम विद्यापीठाने अनेक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा वापर करत सामान्य नागरिकांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे स्टार्टअप्स सुरु केले पाहिजेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यंनी पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून न राहता त्याचा सहाय्यक म्हणून वापर करता यायला हवा, असे यावेळी कुलगुरू डॉ.विलास सपकाळ म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका डॉ.शर्वरी तामणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी कावरखे यांनी केले तर आभार प्रा. सोनल देशमुख यांनी मानले.