सोलापूर – कवी राजेंद्र दंदे लिखित ‘ आयुष्याची शिदोरी ‘ या काव्यसंग्रहात मराठी आणि हिंदी भाषेतील कविता आहेत. या कविता प्रासंगिक, एखाद्या घटना प्रसंगी सुचलेल्या आणि शब्दबद्ध केलेल्या कविता आहेत. मनामध्ये ज्या संवेदना निर्माण झाल्या, जे भाव उमटले त्याचा सहज आणि सोप्या भाषेतील काव्याविष्कार ‘ आयुष्यातील शिदोरी ‘ या काव्यसंग्रहातून प्रत्ययास येतो. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र दंदे यांच्या ‘ आयुष्याची शिदोरी ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजकल्याण केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्य अजितकुमार संगवे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शब्दमुद्रा प्रकाशन, मंगळवेढ्याचे प्रकाशक सुप्रसिद्ध कवी इंद्रजित घुले आणि सिनियर ऑडिटर गोविंद बोन्दर हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, या काव्यसंग्रहात रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या छोट्या – छोट्या क्षणांची, भावना आणि अनुभवांची सहज मांडणी आहे. या कवितांमध्ये मोठे तत्त्वज्ञान मांडण्यापेक्षा माणसाच्या मनात सहज उमटणाऱ्या विचार, आठवणी आणि भावनांचे शब्दरूप अधिक जाणवते. या कविता मानवी वृत्ती प्रवृत्ती, नातीगोती, निसर्ग, भावलेली व्यक्तिमत्वे यावर भाष्य करणाऱ्या आहेत.
कवी व प्रकाशक इंद्रजित घुले यांनी राजेंद्र दंदे यांच्या कविता आपल्याला भावतात. त्यांनी बोजड, अलंकारिक कविता न लिहिता वाचकाला समजतील, रुचतील अशा भाषेत काव्यरचना केल्या आहेत. त्यामुळे वाचक निश्चित या कविता वाचतील असा अशावाद कवी घुले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजितकुमार संगवे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, आमचे प्राशासकीय सहकारी राजेंद्र दंदे हे शिक्षकेत्तर कर्मचारी असून देखील काव्यलेखनाकडे वळले याचा विशेष आनंद आहे. रोजच्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ ते कविता लेखनासाठी देतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे.त्यांच्या हातून अशाच साहित्यकृतींची निर्मिती होवो यासाठी त्यांनी श्री दंदे यांना शुभेच्छा दिल्या.
कवी राजेंद्र दंदे यांनी आपले भावस्पर्शी मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास कॉलेज कर्मचारी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अध्यक्ष दत्ता भोसले, कवी डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. राजकुमार पवार, डॉ. भोवाळ, श्री दंदे यांचे नातेवाईक सूर्यभान बळकार, बालाजी पाठक, सुरेश म्हाळगी व कुटुंबीय यांची उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष बंडगर यांनी केले. आभार राजेंद्र दंदे यांच्या सुनबाई प्रज्ञा दंदे यांनी मानले.























