बार्शी – बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात निवडणुक झालेल्या सर्व १६ च्या जागांवर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत आपली सत्ता कायम राखली आहे. निकालानंतर राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी मुक्तपणे गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. निकालाकडे बार्शी तालुक्यातसह संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.
रविवार ७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. बाजार समितीच्या एकूण १६ जागांसाठी ९६.९८टक्के एवढे मतदान झाले. त्यामुळे, आज सकाळपासूनच निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजलेपासून आदित्य कृष्णा मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टेबलवर मतमोजणी करण्यात आली. दरम्यान १८ जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील २ जागा यापूर्वीच राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १६ जागासाठी रविवारी चूरशीने मतदान झालं होते. सुमारे ९६.९८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी व माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती. याशिवाय ४ अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते. त्यामुळे, आज विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सर्वप्रथम हमाल तोलार गटातील एका जागेची मतमोजणी झाली त्यात मोठ्या फरकाने राऊत गटाचे गजेंद्र मुकटे (५९३) च्या मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर ग्रामपंचायत गटातील ४ जागांचे निकाल हाती आले आले. इथेही राऊत गटाचेच अजित बारंगुळे, नेताजी घायतिडक, हे सुमारे २०० पेक्षा जास्त मताने तर संजय माळी आणि रामेश्वर पाटील हे ८० ते ३५ मतांच्या फरकाने विजयी झाले.
सर्वांचे लक्ष हे सोसायटी मतदारसंघातील निकालाकडे होते. या ठिकाणी सुरुवातीला आर्थिक दुर्बल व मागासवर्ग आणि महिला मतदारसंघातील मतांची मोजणी करण्यात आली. महिला सुमारे १०० च्या मतांच्या फरकाने तर दुसरे गटातील उमेदवार हे ८० ते ३५ मतांच्या फरकाने विजयी झाले. या जागांचा निकाल जाहीर होताच १८ पैकी ११ जागा जिंकल्याने बाजार समितीवर राऊत गटाची सत्ता आल्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मतमोजणी केंद्राच्या बाहेर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. राजाभाऊ राऊत यांचा विजय असो अशी घोषणाबाजी होऊ लागली.
सर्वांचे लक्ष हे सोसायटी मतदार संघातील खुल्या सात जागांच्या निकालाकडे लागले. त्याला कारण तसे होते. या ठिकाणी सोपल गटाच्यावतीने मातब्बर उमेदवार मैदानात उतरवण्यात आले होते.
त्यात काटे ही टक्कर पहावयास मिळाली. मतांचे गठ्ठे बांधत असताना समान मते दिसत होती तर २० पासून ते ६० पर्यत क्रॉस मते आढळून येत होती. तसेच बाद मतांची संख्या ही जास्त असल्याने सर्वांची शेवटपर्यंत धाकधूक वाढली होती. या मतदारसंघातील१६३३ पैकी तब्बल ७६ एवढी मते बाद करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता लागून राहिली होती. राऊत गटाचे उमेदवार रविकांत साळुंखे, बाबा गायकवाड आणि सोपल गटाचे युवराज काटे यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे लक्ष लागले होते. मात्र शेवटी युवराज काटे यांच्यापेक्षा २६ मते जादा मिळाल्याने रविकांत साळुंखे हे विजयी झाले.
सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण जागात सर्वाधिक मते ही युवराज काटे (७६४) त्या खालोखाल नंदकुमार काशीद (७२९), अशोक काशीद व धर्मराज गाडे यांना (७१५) अशी जादा मते मिळाली.
विजयी उमेदवारांमध्ये सोसायटी मतदारसंघातील खुल्या गटात प्रभाकर डमरे (८१८), सुरेश गुंड (८१५), यशवंत माने (८१३), विजय गरड (८०४ ) यांना सर्वाधिक मते मिळाली.
सोसायटी मतदार संघात महिला गटात राऊत गटाच्या मनीषा ताकभाते (८५०) आणि सुमन पाटील (८४४) एवढी मते घेऊन विजयी झाल्या.
दोन्ही बाजुंच्या सर्व उमेदवारांसोबत बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत हे सकाळपासून आकडेवारी घेत मतमोजणी वर लक्ष ठेऊन होते.तर बाजार समितीचे प्रशासक विजय राऊत हे केंद्राबाहेर थांबलेले होते.
मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे ,सहायक निबंधक अनिस सय्यद, उमेश पवार यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे दिली.
रणवीर राऊत मतमोजणी केंद्रातून बाहेर येताच त्याच्यासह जल्लोष सुरु झाला. रणवीर यांनी वडील माजी आमदार राजेंद्र राऊत यांना साष्टांग दंडवत घालत कडकडून मिठी मारली. यावेळी दोघांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी चुलते विजय राऊत यांचेही चरणस्पर्श करत मिठी मारली.
देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आशीर्वाद, आम्ही बाजार समितीत केलेला पारदर्शक कारभार आणि विकासकामे,सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अतोनात घेतलेली मेहनत यामुळे सहकारातील पहिलीच निवडणूक असताना देखील आम्हाला विजय मिळाला. यापुढे देखील सर्वांना सोबत घेऊन शहर व तालुक्याचा विकास करण्यास प्राधान्य देणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्याच्या तोंडात सोन्याचा घास जावा यालाच माझे प्राधान्य असणार आहे.पाठीमागे ज्या चुका झाल्या असतील त्या देखील दुरुस्त केल्या जातील.सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल तोलार आणि व्यापारी मतदारसंघातील सर्व मतदारांनी आमच्यवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.
-राजेंद्र राऊत माजी आमदार
निकाल जाहीर होताच सर्व उमेदवार विजय राऊत, रणवीर राऊत, यांना खांद्यावर घेत आणि गुलालाची उधळण करत उपळाई रोड ते शिवसृष्टी अशी मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार राजेंद्र राऊत हे मिरवणुकीच्या पुढे चालत होते. भगवंताचे दर्शन घेऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले.


















