महायुतीचे पुणे लोकसभासाठीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कसबा मतदारसंघात आले होते. यावेळी मतदारसंघात वाटायच्या उष्माघात प्रथमोपचार औषधी संचावर पंतप्रधानांचे छायाचित्र नसल्याने बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार देखील सुरू झाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने ४०० पार चा नारा दिला असून भाजपला या ४०० च्या आकड्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस पक्षासह देशभरातील विरोधक एकत्रित आले आहेत. तर या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना, तर काँग्रेस पक्षाने आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली असून वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या तीनही उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.