भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून मागणी जास्त आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खननाचे प्रमाण वाढले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आष्टी बावनथडी नदीवर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या 7 टिप्परवर कारवाई करून 1 कोटी 41 लाख 56 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
खनिकर्म विभाग आणि गोबरवाही पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आष्टी गावातील बावनथडी नदीतून अवैधरित्या वाळू उत्खनन करून शासन प्रशासनाची रोज लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती.याची तुमसर तहसीलदारांना माहिती नाही का? हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र खनिकर्म विभागाचे पथक भंडारा येथून येऊन कारवाई करत असताना तुमसर तहसीलदार का नाही, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालं आहे.आष्टी येथे अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती खनिकर्म विभाग व गोबरवाही पोलिस विभागाच्या पथकाला मिळाली असता, 7 ट्रक, एकूण 1,41,56,000 रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.