सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार आता स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. याआधी सरकारनं भारत आटा आणि भारत दाल बाजारात आणली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोदी सरकार स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. आजपासून ‘भारत चावल’ (Bharat Rice) विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा तांदूळ स्वस्त दरात मिळेल. त्यावर अनुदान असेल. ५ आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेला तांदूळ २९ रुपये प्रति किलो दरानं विकला जाईल.
वर्षभरात तांदळाचा दर १५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याची झळ सर्वसामान्यांना बसली आहे. महागाईचा विचार करता केंद्र सरकारनं तांदळावर अनुदान दिलं आहे. त्यामुळे सामान्यांना स्वस्त दरात तांदूळ मिळेल. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारत चावल ब्रँड लॉन्च करण्यात येईल. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं सर्वेतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंज्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून भारत चावल विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ सोबतच हा तांदूळ केंद्रीय भंडारच्या रिटेल सेंटर्ससोबत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही मिळेल.
अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार भारत चावल ५ आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकार किरकोळ बाजारात विक्रीसाठी ५ लाख टन तांदूळ उपलब्ध करुन देईल. तांदळाचे दर गेल्या वर्षभरात वाढलेले असले तरीही तांदळाची निर्यात रोखण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मुक्त बाजार विक्री योजनेच्या माध्यमातून तांदूळ विक्री करण्याचा प्रयत्न सरकारनं करुन पाहिला. पण त्याला लोकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. यानंतर केंद्र सरकारनं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून किरकोळ विक्रीचा निर्णय घेतला. भारत आटा आणि भारत दालसारखा चांगला प्रतिसाद भारत चावलला मिळेल अशी आशा सरकारला आहे.