अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.)
कारागृहात बंदीजनांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या आहे. मात्र आता बंदीजनांना बराकीत प्रवेश करण्यासाठी बायोमेट्रिक अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक बराकीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही प्रणाली लागणार असून, गोल फिरणाऱ्या दारातून कैद्यांची ‘इनकमिंग’, ’आऊटगोईंग’ होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये ही प्रणाली लागू होणार आहे. तर मुंबई, येरवडा, नाशिक, नागपूर, अमरावती येथे ही प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू झाले आहे.
कारागृहांत निम्म्या मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांचा भार आला आहे. कैद्यांची संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कैद्यांकडे मोबाइल, गांजा, दारू व अन्य अमली पदार्थ सापडत आहेत. परिणामी कारागृह प्रशासनाने कैदी ज्या बराकीत बंदीस्त असेल, त्याच बराकीत त्याला ये-जा करता येणार आहे. इतर कोणत्याही बराकीत बंदीजनाला प्रवेश करता येणार नाही, अशी नवी बायोमेट्रिक प्रणाली असणार आहे.
यात बंदीजनांचे डोळे स्कॅन हाेतील. बोटांचे ठसे घेतले जातील. त्याशिवाय कैद्यांना गोल फिरणाऱ्या दारातून (ट्रंग स्टाईल गेट) प्रवेश मिळणार नाही. या प्रणालीमुळे कोणत्या बराकीत किती कैदी बंदीस्त आहेत ही देखील आकडेवारी कारागृह अधीक्षकांना अचूकपणे कळणार आहे. राज्यात ६० कारागृहांमध्ये ही प्रणाली लागू होणार असून, पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक रोड, कोल्हापूर, येरवडा (पुणे), अमरावती, मुंबई आर्थर रोड, तळोजा व ठाणे या नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवली जात आहे.
कंट्रोल रूममधून होणार नियंत्रण
बायोमेट्रिक प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक कारागृहात कंट्रोल रूम असणार आहे. कारागृह अधीक्षकांकडे त्याचे नियंत्रण असेल. बराकीत सकाळी-सायंकाळी कैद्यांची माेजदाद, ये-जा करणे, जेवणाची वेळ, कोर्ट केस, मुलाखतीसाठी गेलेल्या बंदीजनांची संख्या एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच दुपारी १२ ते ३ कैद्यांची बंदीस्त वेळसुद्धा यात अचूकपणे मिळेल.
“बराकीत बायोमेट्रिक प्रणालीसाठी सर्व्हरचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसातच ते पूर्ण होऊन कैद्यांना ट्रंग स्टाईल गेटमधूनच प्रवेश करावा लागेल. बंदीजनांना अन्य कोणत्याही बराकीत नो एन्ट्री असेल.”
– कीर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह