अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.)
प्रहार जनशक्ती पक्षाचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाची उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याला पैसे मागितले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडू हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नेत्यांना शिव्या देतात, तोडपाणी करतात, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
आमदार रवी राणा म्हणाले, अचलपूर मतदार संघ भकास झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा नाही, एकही नवीन महाविद्यालय त्यांनी आणले नाही. स्वत:च्या मतदारसंघात त्यांचे लक्ष नाही. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पण, ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नेत्यांना शिव्या घालतात. केंद्र सरकारच्या योजनांचे अनुदान बच्चू कडू यांनी लाटले आहे. अनेक उद्योग बंद पडले.
पण, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. बच्चू कडू हे निवडणुकीत नेत्यांकडून पैसे घेतात. अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करण्यात आला. नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण, त्याआधी उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याकडे पैसे मागितले, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला.