लोकप्रिय कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोकप्रिय कॉमेडियन नील नंदाचे अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले. त्याने ३२ वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. नीलचे मॅनेजर ग्रेग वेस यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. मात्र त्याच्या निधनाची तारीख आणि कारण काय होते याबाबतचा तपशील त्याच्या कुटुंबाच्या आणि गर्लफ्रेंडच्या विनंतीवरून जाणूनबुजून उघड करण्यात आला नव्हता.
दरम्यान यूएसए टुडेशी बोलताना वेस यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘११ वर्षांपासून माझा क्लाएंट असणाऱ्या नीलचे निधन झाले. तो केवळ एक उत्तम कॉमिक नव्हता तर एक चांगला मित्र आणि एक विलक्षण माणूस होता.’ मीडिया रिपोर्टनुसार ग्रेग वेस नीलला तो १९ वर्षांचा असल्यापासून ओळखत होते. नीलने अलीकडेच त्याचा वाढदिवस टोरंटोमध्ये साजरा केला होता आणि त्यानंतर त्याच्या निधनाचे वृत्त धडकल्याने त्याचे आप्तस्वकीय आणि फॉलोअर्ससाठी हे वृत्त धक्कादायक होते.
निधनाच्या काही दिवस आधी त्याने सोशल मीडियावर ‘बर्थडे वीकेंड’ संदर्भात पोस्ट करत त्याचे टोरंटोमधील जोकर्स थिएटर अँड कॉमेडी क्लबमध्ये असणाऱ्या शोचे प्रमोशनही केले होते. या पोस्टमध्ये त्याने असे म्हटलेले की तो यावर्षी त्याचा वाढदिवस कॅनडामध्ये साजरा करणार आहे. १५ आणि १६ डिसेंबर रोजी हे शो होणार असल्याची माहिती त्याने दिलेली. नीलच्या निधनानंतर टोरंटोमधील या कॉमेडी क्लबनेही शोक व्यक्त केला.
भारतीय वंशाचा असणाऱ्या नीलचा जन्म अटलांटामध्ये भारतीय स्थलांतरित पालकांच्या पोटी झाला होता. तो लॉस एंजलिसमध्ये वास्तव्यास होता. नील नंदा जिमी किमेल लाइव्ह आणि कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डेव्हिन्स हाऊस पार्टीसाठी विशेष लोकप्रिय होता. त्याच्या अशा अचानक निधनानंतर त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कॉमेडियन संदर्भात पोस्ट करत जगभरातील त्याचे चाहते श्रद्धांजली अर्पण करत आहेत.