सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडेमार करून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना तडवळकर म्हणाल्या की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची लाखो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानशी तुलना करणे हे अत्यंत निंदनीय, संतापजनक असून, करोडो देशभक्तांच्या भावना दुखावणारे आहे. या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची मूळ भूमिकाच दिसून येते.
राजकीय फायद्यासाठी लांगूलचालन करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय आहे. पण मतांसाठी व तुष्टीकरणासाठी शिवरायांचा अपमान करणे घृणास्पद प्रकार आहे. हा मराठी अस्मितेवर एक प्रकारचा घालाच आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. प्रदेशाध्यक्षपदावरून सपकाळ यांची हकालपट्टी केली पाहिजे. अशी मागणीही तडवळकर यांनी केली.
यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपूबरोबर होते तेव्हा काँग्रेसी नीच मानसिकतेचा कडेलोट होतो. ज्यांच्यामुळे स्वराज्य मिळाले, त्या शिवबांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. याबाबत हर्षवर्धन सपकाळ माफी मागीतली पाहिजे.
या आंदोलनात माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक भारत बडूरवाले, रवी कय्यावाले, नागेश सरगम, अक्षय अंजीखाने, साधना संगवे, सुधा अल्लीमोरे, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा आदी पदाधिकारी, नगरसेवक, आघाडी,मंडल, मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ट, सेल, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांसह शिवभक्त सर्व उपस्थित होते.



























