सोलापूर लोकसभा मतदार संघावर सलग दहा वर्षे भाजपची सत्ता असूनही भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या जोमाने कामाला लागल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून त्यांचे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यात दौरे वाढले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा निवडणूक जिंकायची या ईर्षेने त्या मैदानात उतरून तयारीला लागल्या आहेत. तर विरोधी भाजपमध्ये मात्र अजूनही कमालीची शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्यातरी काँग्रेसने वातावरण निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात २००९ मध्ये पहिल्यांदा भाजपने बाजी मारली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ही सलग दुसऱ्यांदा भाजपने विजय मिळवला. दोन्ही वेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेसुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. आमदार शिंदे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे.
मागील आठ दिवसापूर्वी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील गावांचा दौरा करून स्थानिक शेतकरी, कामगार आणि महिलांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. सध्या त्या पंढरपूर तालुक्यातील गावांना भेटी देवून लोकांशी संवाद साधत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये लढाई जिंकायची, असा निर्धार त्यांनी केला आहे.ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची पंढरपूर – मंगळवेढ्यातील जनतेशी अजूनही नाळ घट्ट आहे. आजही शिंदे यांचे कार्यकर्ते गावागावात आहेत. त्याचा फायदा त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना होईल, अशी त्यांना खात्री आहे.