अक्कलकोट – शहरातील महा ई-सेवा केंद्रात सरकारी दाखले काढण्यासाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा नागरिकांकडून अधिक पैसे घेऊन लुटण्याचे प्रकार चालू आहेत. तहसीलदार कार्यालयाकडे याबाबत वारंवार तक्रार अर्ज करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने दाखले काढण्यासाठी जास्त पैसे उकळणाऱ्या केंद्रांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी सेवानिवृत्त ए.एस.आय सत्तार शेख यांनी केली आहे.
अक्कलकोट शहरात सुमारे वीसहून अधिक महा ई सेवा केंद्रे आहेत. अनेक केंद्रांमध्ये रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, नवीन रेशन कार्ड, दुबार आणि रेशन कार्ड दाखल्यासह अन्य दाखले काढून दिले जातात. प्रत्येक दाखला काढण्यासाठी २० रुपये शुल्क आकारणी, १० रुपयांचे कोर्ट फी स्टँप आणि ३ रुपये सेवा कर मिळून ३३ रुपये रक्कम ठरवून दिली आहे. पण अनेक महा ई सेवा केंद्रे ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारून नागरिकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अनेक नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे तोंडी व लेखी तक्रार अर्ज केले होते. सरकारने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून घेत असल्याची लेखी तक्रार सत्तार शेख यांनी देखील तहसीलदार कार्यालयाकडे केली होती. त्यावर, ‘महा ई सेवा केंद्रांकडून जास्त रक्कम आकारली जाण्याची बाब अतिशय गंभीर असून, तहसील कार्यालयाकडून अचानक तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या केंद्रचालकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
शहर आणि ग्रामीण भागात जास्त पैसे घेणाऱ्या सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयाने मोहीम राबवली पाहिजे. आजही अनेक केंद्रावर विविध दाखले काढण्यासाठी तीनशे रुपयांपासून हजार रुपये पर्यंत घेतले जातात. त्यामुळे प्रशासनाने गरीब नागरिकांची लूट रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे महा ई सेवा केंद्राविषयी तक्रार करण्यासाठी दाखल्यावर टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.’ अशी रास्त मागणी शहर वासियातून होत आहे.

























