आटपाडी – आटपाडी तलावापासून निघालेले आणि आटपाडी शहराला वळसा घालुन पुढे झेपावणारे दोन प्रचंड मोठे ओढे अतिक्रमणाच्या माध्यमातून गिळण्याचा प्रकार आटपाडीतल्या सर्वपक्षीय समर्थकांकडून सुरु असून स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही प्रचंड अतिक्रमणे दररोज सुरूच आहेत . ती तातडीने नेस्तनाबुत करा . अशी मागणी आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केली आहे .
राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संबधीत खात्याचे मंत्री, सांगली जिल्ह्याशी संबधीत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी या अतिक्रमणाऱ्या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .
काही दिवसापुर्वी मुंबईत प्रचंड माया कमविलेल्या एका कपाळ करंट्या कथीत भ्रष्ट उद्योगपतीने आपल्या आक्राळ विक्राळ यंत्रणेच्या माध्यमातून ओढ्यात एकर भर जागेचे सपाटीकरण करून आपले साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न चालविला असल्याची सर्वत्र मोठी बोंब उठली आहे. याठिकाणी तो अवैध व्यवसाय सुरू करणार असल्याची चर्चा आहे . शिवाय अधिकाऱ्यांना मोठे दान दिल्यानेच हे महाशय असे धाडस करीत आहेत . अशी सर्वत्र चर्चा आहे . या कपाळ करंट्यासह ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण करून दुकाने, घरे, बंगले, शेतजमीन तयार केली आहे . अशा सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, ही सर्व अतिक्रमणे जमीन दोस्त करावीत. अशी शहर वाशीयांसह आपलीही अपेक्षा असल्याचे सादिक खाटीक म्हंटले आहे .
याशिवाय आटपाडी शहरातल्या अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर, देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या शासकीय जमिनीवरही मोठ मोठाल्या इमारती उभारून केली गेलेली अतिक्रमणे, तसेच गावची संरक्षंक भिंत पाडून केली गेलेली अतिक्रमणे आणि दोन्ही ओढा पात्रातील विविध प्रकारची अतिक्रमणे, अशी सुमारे दोन कोटी रुपये किंमतीच्या शासकीय जागांवरील अतिक्रमणे तातडीने उध्वस्त करावीत यासाठी आपण अनेक वर्षापासून आवाज उठवित आलो आहोत याकडे सादिकभाई खाटीक यांनी लक्ष वेधले आहे .
आटपाडीच्या मुख्य रस्त्यालगत आटपाडी बाजार पटांगणातील ओढा ते धांडोर ओढा या दरम्यान आटपाडी शहराच्या मुख्य रस्त्या लगतच्या विविध ठिकाणच्या शासकीय जागांवर उभारलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारतींच्या जागांचे आणि देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जमिनीचे विक्री खरेदीचे दस्त कसे अधिकृत ठरू शकतात. अधिकाऱ्यांना हाताशी धरून केले गेलेले हे बेकायदेशीर व्यवहार तातडीने रद्द करून त्यावर उभारलेल्या प्रचंड इमारती उध्वस्त करीत ही अतिक्रमणे युद्ध पातळीवर हटवावीत, नेस्तनाबुत करावीत .
आटपाडी शहराचा सिटी सर्व्हे झाला त्यावेळपासून आज अखेर अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासन म्हणून नोंद असणाऱ्या शासकीय जमिनींवर मोठ मोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत . भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी केल्याचे तर काही जागा बाबत सिटी सर्वेच्या रेकॉर्डवरही घालमेल करणारी उलाघाल केल्याची मोठी चर्चा आहे . बाजार पटांगण लगतचे आटपाडीचे ओढापात्र ते धांडोर ओढ्याचे पात्र या दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगतच्या सर्व जमिनींचे मागील ५० वर्षापर्यतचे रेकॉर्ड तपासावे . यातून अतिक्रमणां बाबतचे सत्य बाहेर आल्या शिवाय राहणार नाही .
शेकडो कोटी रुपये किंमतीच्या आटपाडीच्या दोन्ही ओढा पात्रात आणि शासकीय जागांवर झालेली आणि सुरु असलेली अतिक्रमणे त्वरीत काढून टाकावीत . आटपाडी शहराभोवतीच्या ओढा पात्रात सुरू असलेल्या अतिक्रमणाने सदरचे ओढेच नष्ट करण्याचा विडा काही जणांनी उचलला असून शासनकर्त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आटपाडीतील सर्व ठिकाणच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई केली पाहिजे. अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .
ओढे आणि गावाला वळसा घालणाऱ्या जुन्या संरक्षक तटबंदी भिंती बाहेरच्या मोकळ्या जागांवरही मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत . काही पूर्ण झाली आहेत . याकडे आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांचे लक्ष नाही . या अतिक्रमणांबाबत प्रसार माध्यमांतून गत १० वर्षापासून सातत्याने आपण वारंवार मोठा आवाज उठविला आहे . तथापि प्रशासनातील कोणालाही याबाबत कारवाई करावी . असे आज अखेर वाटले नाही . या ओढा पात्रात आणि संरक्षक तटबंदी भिंती बाहेरच्या जागांवर केलेल्या अतिक्रमणांना तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, शहराचे काही प्रतिष्ठित नेतेमंडळीची अप्रत्यक्ष फुस असल्याची चर्चा होती व आजही आहे . काही अतिक्रमणदारांनी ग्रामपंचायत दप्तरी नोंदी करून सदरच्या अतिक्रमणीत जागा त्यांच्याच असल्याचा आभास निर्माण केल्याचेही लोक सांगताहेत . खरेदी १० फुटाची आणि जागा व्यापली १०० फुटाची असा प्रकार अनेकांनी केला आहे . पूर्वी आटपाडी शहराला संपूर्ण तटबंदी होती. सहा सात फुट रूंदीची, वीस पंचवीस फुट उंचीची आटपाडी गावाला वेढा घालणारी भिंत आणि अनेक मोठे बुरुज यामध्ये गाव वसलेले होते . अशी जुन्या आटपाडीची रचना होती .
आटपाडीचा मोठा तलाव बनपूरी – आटपाडीच्या मुख्य ओढ्यावरच बांधला गेला . पूर्वी त्या तलावाच्या जागेच्या मध्यभागातून आटपाडी गावाच्या दिशेने भला मोठा ओढा वहात असे. नाईक – जाधववस्ती, मगर वस्तीच्या जवळून अंबादास देशपांडे यांच्या मळ्याला वळसा घालून साईबाबा मंदिर चौकाच्या मागच्या बाजूने, हा ओढा गावाकडे झेपावत असे . पुढे नरसू माळी जाधव यांच्या शेताजवळून पुन्हा वळसा घेत गावच्या मोठ्या तटबंदीच्या भिंती आणि बुरुजांना घासून बाजार पटांगणाकडे वहात असे . बाजार पटांगणाला वळसा घालत बुडकी नावाच्या उंचावरच्या मळ्याला यु टर्न घेत पाटील मळा , कोळेकर मळा करत माण नदीला मिळत असे. सदरचा ओढा खरसुंडी, बनपूरी, कामथ कडून येणाऱ्या पाणी प्रवाहाचा होता . परंतू या ओढ्यावरच आटपाडीचा मोठा तलाव बांधल्याने या पाण्याचा प्रवाह सांडव्याद्वारे दुसऱ्या ओढ्यातून तो बाजार पटांगणा जवळच्या जुन्या ओढ्याला मिळू लागला. त्यामुळे जुन्या ओढ्यातला काही महिने वाहणारा प्रवाह अतिशय कमी झाला आणि मागच्या दहा – पंधरा वर्षात तर पूर्णपणे बंद झाल्यात जमा आहे . जुना ओढा अंबामाता मंदिराला वळसा घालून पुढे तटबंदीच्या भिंतीला घासून बाजार पटांगणाकडे जाताना ८० ते ९० मीटरपेक्षाही रूदींचे पात्र बनत असे . या पात्रात दोन्ही बाजुंनी मोठी अतिक्रमणे झाली आहेत . होवू लागली आहेत. अनेकांनी ओढ्यातच शेतजमिनी , सपाट जागा तयार करीत ओढा संपवण्याचाच धडाका लावला आहे . तलावापासून बाजार पटांगणा पर्यंतच्या ओढ्याची पाहणी केल्यास सर्व चित्र स्पष्ट दिसून येईल . नरसू जाधव माळी यांच्या मळ्याला वळसा घालून पुढे अंबामाता मंदिराला पुढे विस्तीर्ण चंद्राकार करीत बाजार पटांगणाकडे झेपावणाऱ्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येईल . ओढा पात्राला लागून ब्राम्हणपूरी लगत झालेल्या हॉस्पीटलची इमारत चक्क तटबंदी भिंतीच्याही बाहेर पाच सात फुट बांधली गेली आहे. तटबंदी भिंतीची सहा सात फुटाची जागा आणि तटबंदी भिंतीच्या बाहेरील ओढा पात्रातील जागा , हॉस्पीटलला जागा विकणारांची असणे शक्य नाही . गावची तटबंदी , बुरुज कुणाच्या खाजगी जागेत बांधले होते म्हणणे म्हणजे अप्रत्यक्ष भ्रष्टाचारालाच पाठीशी घालण्याचे ठरू शकेल . तटबंदी भिंतीच्या जागा धरून बाहेर येत केलेली बांधकामे कुणी कायदेशीर ठरविली आहेत . त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहीजे . अशीच अवस्था ब्राम्हणपुरी लगतच्या तटबंदी भिंती बाहेर ओढा पात्रात झालेल्या , होत असलेल्या बांधकामांची आहे . ब्राम्हणपूरी तटबंदी भिंतीच्या आतील श्रीराम मंदिर , दत्ताचा आड , अगदी पुढे इनामदारांच्या घराजवळून ओढ्यात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यांची रचना पाहील्यास अनेक जणांनी तटबंदी भिंतीच्या बाहेर ओढा पात्रात अतिक्रमण केल्याचे दिसून येईल . आणि याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ओढा पात्र तिकडून संपवत आणीत ओढ्यातून गेलेल्या रस्त्यापर्यत जागा रेटण्याचा सुरू असल्याचा प्रयत्न गावच्या विकासाची दिशा आणि दशा काय आहे ते दाखवून देईल . आटपाडी गावच्या संरक्षक तटबंदी भिंती मधून कोणालाही दरवाजा खिडक्या काढण्याचा अधिकार नसतानाही अनेकांनी भिंतीच्या बाहेर येत घरादारांना खिडक्या, दारे लावून, ओढ्यातून नवी वहिवाट सुरू केली आहे हे ही धक्कादायक आहे .
अंबामाता मंदिराला वळसा मारून जाणाऱ्या ओढ्याच्या लगत पन्नास साठ फुट घेरीचे दोन प्रचंड वड शे – दिडशे वर्षापासून उभे होते . २५ — ३० वर्षापूर्वी वादळी वाऱ्याने ते पडल्याने त्या वडांच्या जागांपासून पुढे ओढ्यात येत काही बांधकामे झाली आहेत . आणखी नवे अतिक्रमण सुरू आहे . याच वळशा दरम्यान गावात जाणाऱ्या रस्त्यालगत एका बाजूने तटबंदीची भली मोठी भिंत होती . त्यातील काही भाग आजही सुस्थितीत उभा आहे . गवळी – म्हेत्रेंच्या बोळापर्यंत सदरची भिंत होती . अशी जुनी माणसे सांगत . या पाच सहा फुटी भिंतीच्या बाहेर येऊन मोकळ्या जागेत खोल्या बांधून त्याच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे करून त्यांना कायदेशीर मुलामा देण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचेही बोलले जात आहे . आटपाडी बाजार पटांगणा लगतच्या ओढा पात्रात दोन्हीं बाजूंनी दुकाने लावून अतिक्रमण केले गेले आहे . वास्तवीक या ओढा पात्रातून अतिवेगाने दुथडी भरून पाणी वहात असते . त्यामुळे पावसाळ्यात धोक्याचीच घंटा असतानाही मोठमोठी दुकाने थाटून अनेकांनी ओढा पात्रच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे . सदरच्या आटपाडी शहराभोवतीच्या दोन्ही ओढ्यातील झालेली , होत असलेली सर्व अतिक्रमणे तातडीने काढून ओढा पात्रं मोकळी करावीत आणि अतिक्रमण कर्त्याना धडा शिकविला जावा अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























