अहिल्यानगर – प्रत्येकाला आपले हक्क मिळावे यासाठी न्यायाची स्थापना झाली. आपले अधिकार मिळविण्यासाठी आपण न्यायालयात येतो; मात्र हे अधिकार मिळविण्यासाठी आपण आपापसांतील वाद सामंजस्यानेही मिटवू शकतो. चांगला समाज घडविण्यासाठी आपण चांगली वृत्ती जोपासावी व किरकोळ, तडजोडपात्र प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची तयारी ठेवावी. लोकअदालतमध्ये प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-३ एम. एस. लोणे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कातोरे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बी. कोठारी उपस्थित होते.
न्यायिक अधिकारी एस. आर. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. न्यायिक अधिकारी श्रीमती डी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक, विधिज्ञ व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















