चंद्रपूर 3 जुलै (हिं.स.) –
ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता पर्यटकांसाठी मान्सून सफारी सोमवारपासून बंद झाली आहे. दरम्यान बफर झोन मध्ये मान्सून पर्यटन राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. पण जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात या संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. पण ताडोबात बहुतांश रस्ते चांगले असल्याने त्यामुळे सफारीला बहुदा फटका बसत नाही. पण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे ताडोबाला पावसाळी सुट्टी मिळाली आहे. पण बफर झोनचे पंधरा दरवाजे पाऊस,रस्ते स्थिती व उपलब्धता बघून हे पर्यटनासाठी कमी -अधिक प्रमाणात खुले राहतील अशी माहिती व्याघ्र प्रकल्प सूत्रांनी हिं.स. शी बोलताना दिली. त्यामुळे बफर क्षेत्रात मान्सून पर्यटन सुरु राहणार आहे.
रविवारी शेवटचा दिवस असल्याने ताडोबात व्याघ्र दर्शनाच्या अपेक्षेप्रमाणे पर्यटकांची तुडुंब गर्दी होती. यावेळी मोठ्या अपेक्षेने ताडोबात गेलेल्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. उन्हाळी पर्यटन हंगामाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या २ बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले. मोहर्ली गेटच्या अगदी जवळ पर्यटकांना जुन्या विहिरीजवळ सोनम आणि तिच्या २ बछड्यांचे दर्शन झाले. वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळापुरे यांनी आपल्या कॅमेरात हे दृश्य कैद केले. रस्त्याच्या अगदी बाजूला सोनम बछड्यांचे लाड करत असल्याचे विलोभनीय दृश्य अनेक पर्यटकांच्या नजरेस भरले.