भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे या तिघांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आज, बुधवारी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये या नावांचा समावेश आहे.
अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. त्यावर आज भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकी दिल्याने मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या आणि त्यांनी अनेकता आपली नाराजी व्यक्तही केली होती.
त्यामुळे कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेय. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जांगांची निवडणूक होत आहे. महायुतीने या सर्व 6 जागा लढवण्याची तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. यासंदर्भात मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपने चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणे कठीण असल्याचे दिसल्यामुळे भाजपने चौथा उमेदवार देण्याचे टाळले आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.