बार्शी – नगर परिषदेचा सन २०२६-२७ चा ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप झाले.
सभेच्या प्रारंभी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी अर्थसंकल्प सादर करताना अभिभाषणात महिलांना केंद्रस्थानी ठेवून, शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने कोणतीही करवाढ व दरवाढ न करता हा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगितले. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पात शासनाकडून प्राप्त होणारे विविध प्रकारचे अनुदानित अंशदानी तसेच विविध योजना अंतर्गत कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य इत्यादी द्वारे ४९८ कोटी ७१ लाख ४२ हजार भांडवली जमेस धरून नगरपरिषदेचा सन २०२६- २७ मध्ये एकूण ५१२ कोटी ८६ लाख ४२ हजार ४०४ रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे. प्रारंभिक शिल्लक जमा धरता एकूण ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी तब्बल ४३ मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण करत महसुली व भांडवली जमा यामध्ये आकडे फुगवून सादर केल्याचा आरोप केला. अधिकारी वर्ग सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची दिशाभूल करत असे आहेत का ? असा सवाल केला.
अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा तक्ता नसून शहराच्या विकासाचा कायदेशीर आराखडा आहे. कररुपी पैसा हा जनतेचा असून आपण त्याचे विश्वस्त आहोत, असे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समितीचे बजेट सुमारे ७०० कोटी असताना बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याची टीका त्यांनी केली.
अनेक योजनांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता नसताना तरतुद दाखविल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
बार्शी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात २५% देवस्थान, २५% नगरपरिषद व ५०% राज्य शासन निधी अशी तरतूद असल्याचे सांगत आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.
उजनी पाणीपुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाईन संदर्भात शासनाकडून ८०% अनुदान अपेक्षित असताना संबंधित ठेकेदारास ८०% पेक्षा अधिक बिल अदा झाल्याचा आरोप करत संभाव्य अनियमिततेचा संशय त्यांनी व्यक्त केला.
अक्कलकोटे यांनी अर्थसंकल्पात खालील विषयांवर तरतूद करण्याची मागणी केली
शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तरतूद करावी
वाहतूक समस्येसाठी सिग्नल व्यवस्था वाढवावी. पर्यावरण संवर्धन व धूळ प्रदूषणावर भरीव उपाययोजना. सामाजिक संस्थांना स्मशानभूमी, शाळा व बगीचा दत्तक देण्याची योजना. बार्शी शहरातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या परिसरातील रस्त्यांवर कमानी उभाराव्यात. दस्तगीर दर्ग्याच्या दुरुस्तीसाठी निधी.
विजय राऊत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
या अर्थसंकल्पात बार्शी शहराचा “सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार केला असल्याचे विजय राऊत यांनी सांगितले. अर्थसंकल्पाचे स्वागत करत शहरातील प्रत्येक भागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच निधी वाटपात भेदभाव होणार नाही, अशी ग्वाही दिली. शासनाच्या योजना 100% राबविण्याचा प्रयत्न होईल, असेही त्यांनी सांगितले. महिलांसाठी अलीपुर रोड व उपळाई रोड येथे नवीन स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
सभागृहात खडाजंगी
माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी हा अर्थसंकल्प नियोजनशून्य व भ्रष्टाचाराने भरलेला असल्याचा आरोप करत गटार दुरुस्ती, भुयारी गटार योजना, घरपट्टी-नळपट्टी वसुलीतील तफावत, अपूर्ण कामे यांवर प्रश्न उपस्थित केले.
यावर सत्ताधारी नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे, दीपक राऊत, अमोल चव्हाण, भैय्या बारंगुळे व उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
विद्या बंगाळे यांची समज
गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका विद्या बंगाळे यांनी सभागृहाचे गांभीर्य राखण्याचे आवाहन केले. ५०% महिला सदस्य उपस्थित असताना अशा प्रकारचा गोंधळ योग्य नाही. प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहात विरोधी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे, आणि विद्या बंगाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून ११ कोटीची तरतूद आहे तर याच ठिकाणी हा खर्च व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भीम नगर, सिद्धार्थ नगर आणि अण्णाभाऊ साठे नगर या भागात नव्याने गटारी आणि सिमेंट रस्ते व इतर मूलभूत सुविधा व्हाव्यात, अशी जोरदार मागणी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे आणि विद्या बंगाळे यांनी केली.
त्यांनी दलित वस्त्या, महिला व सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले.
महिला व बालकल्याणावर भर
सत्ताधारी नगरसेविका कांचन मोहिते यांनी महिला व बालकल्याण विषयक योजनांमध्ये अधिक तरतूद करण्याची मागणी केली. विरोधी नगरसेवक अनिकेत कारंडे यांनी पाणीपुरवठा विभागातील वाल्व ओपनरवरील वाढत्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला. संदेश काकडे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी योग्य असल्याचे स्पष्ट केले.
या सभेत नगरसेवक भारत पवार, महेदिमियां लांडगे, सायरा मुल्ला, रागिनी पाचपुते, आकाश राऊत, मुज्जमिल पठाण आदींनी सहभाग घेतला.
























