वेळापूर – रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्या विद्यमाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी रोबोट स्पर्धा “INVENत्रा 2K25” स्टेट लेवल रोबो सॉकर चॅम्पियनशिप २०२५ चे राज्यस्तरीय अजिंक्यपद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर च्या रोबो एल १ टीमने पटकावून स्पर्धेचे पहिले चॅम्पियन होण्याचा बहूमान मिळवला. राजमाता जिजाऊसाहेब सभागृह (कॉनव्होकेशन हॉल) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे गुरुवार (ता. ११) रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळा यांच्यातील २२ संघाने सहभाग नोंदवला होता.
सन २०२४—२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावरून जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळा निवडण्यात आल्या होत्या. त्या शाळांना रोबोटिक्स संदर्भातील इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), रोबोटिक्स एज्युकेशनल किट्स पुरवण्यात आले होते. त्यासंदर्भात जिल्हानिहाय जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये राज्यस्तरीय रोबोसॉकर चॅम्पियनशिप २०२५ ची घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जि.प.प्रा.शाळा लवंग, केंद्र महाळुंग या शाळेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक लेवल वरती चुरशीचे सामने झाले. कष्ट, सराव, योग्य मार्गदर्शन यामुळे लवंगच्या ‘रोबो एल 1’ संघाने फायनल मध्ये सिंधुदुर्ग संघावरती मात केली आणि पहिल्या राज्यस्तरीय रोबोसॉकर स्पर्धेचे पहिले विजेते होण्याचा बहुमान मिळवला.
लवंग टीम मध्ये शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक जावीद मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या टीम मध्ये शाळेतील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी संस्कार नितीन वाघ (कॅप्टन), प्रतीक भारत चव्हाण (पोझिशन डायरेक्टर) आणि श्रेयस भिमराव निंबाळकर( रोबो मेकर) यांनी कार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार, सहकारी शिक्षक शुभांगी हिरवे, संगीता भोंग, करीम कोरबू यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाणाऱ्या या दैदीप्यमान यशाबद्दल लवंग गावचे सरपंच प्रशांतभैया पाटील, उपसरपंच सज्जन दुरापे, शा.व्य.स.अध्यक्षा कल्याणी चव्हाण आणि सर्व सदस्य, तसेच पालक यांनी कौतुक केले. पंचायत समिती माळशिरस गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, अकलूज बीट शिक्षण विस्ताराधिकारी तथा केंद्रप्रमुख महाळुंग भक्ती नाचणे यांनी टीमचे व शाळेचे अभिनंदन केले.
कोल्हापूर: राज्यस्तरीय रोबो सॉकर चॅम्पियनशिप विजेती लवंग शाळेची टीम. सोबत मार्गदर्शक शिक्षक जावीद मुलाणी.

























