अक्कलकोट – संशय कितीही गंभीर असला तरी तो पुराव्याचा पर्याय ठरत नाही, म्हणून आरोपींना जामीन मंजूर करावा अशी युक्तिवाद केल्यानंतर आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी प्रकरणातील ४ आरोपींना सत्र न्यायालय सोलापूर येथून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
आंतरराज्य चारचाकी वाहन चोरीच्या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गु.र. क्र. ०४९९/२०२५, दिनांक २४ सप्टेंबर २०२५, नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), ३१८(४), ३३६(२), ३३६(३) व ३४०(२) प्रमाणे आरोपी क्र. १) अजीम सलीमखान पठाण, वय ३६ वर्षे, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा, आरोपी क्र. २) प्रमोद सुनिल वायदंडे, वय २६ वर्षे, रा. धामनेर स्टेशन, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा,आरोपी क्र. ३) फिरोज शीराज मोहम्मद, वय ३५ वर्षे, रा. आर.टी. नगर, बेंगलोर, कर्नाटक, आरोपी क्र. ४) इरषाद सफिउल्ला सय्यद, वय ३४ वर्षे, रा. मुलबागल, कोलार, कर्नाटक, यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. संबंधित प्रकरणात तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून ५ अलीशान कार,१ टोयोटा फॉरच्युनर, ३ ह्युंडाई क्रेटा, १ मारुती ब्रेझा व मोबाईल हँडसेट असा एकूण ८३ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर घटनेतील चारही आरोपींनी सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी निर्दोष असून ते पुराव्यात हस्तक्षेप करणार नाहीत व जामीनदार देण्यास तयार आहेत. आरोपी क्र. २ ते ४ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, आरोपी क्र. १ विरोधात काही गुन्हे नोंद असले तरी त्या आधारावर अर्ज नामंजूर करता येत नाही. संशय कितीही गंभीर असला तरी तो पुराव्याचा पर्याय ठरत नाही, म्हणून आरोपींना जामीन मंजूर करावा अशी आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंची सुनावणी घेतल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. ऐश्वर्या जाधव यांनी आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अभिषेक नागटिळक आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले आणि सरकारतर्फे ॲड. अमोघसिद्ध कोरे यांनी काम पाहिले.