सोलापूर : ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी.
सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र (STP) आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता.
या वर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर संपूर्णपणे जलमग्न झाले आहे. यामुळे केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.पाहणी दरम्यान आयुक्तांनी भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचेही आदेश दिले.
याशिवाय, निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला आणि मंगल कार्यालय समोरील तार-कंपाउंडसह अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच झोन क्रमांक ५ मधील कल्याण नगर भाग-३ येथील सार्वजनिक नळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले.
या पाहणीदरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सहअभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी तळीखेडे,राहुल शिंदे,लक्ष्मी इंजिनिअरिंगचे प्रतिनिधी अनिकेत जोशी,वेपकॉस कन्सल्टंटचे अनिल जाधव, शेफाली दिलपाक आदी उपस्थिती होते. महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील मलनिस्सारण व्यवस्था मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना वेगाने राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.


















