हदगाव / नांदेड – नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित होताच हदगाव शहरात विविध पक्षांतर्गत राजकीय हालचालींना चांगलाच वेग घेतल्याचा दिसून येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुकीस बराच अवधी लांबणीवर पडले होते. प्रशासकाच्या कारभाराखाली राहिलेल्या नगर परिषद वर सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस व शिवसेना ( शिंदे गट) या पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून इच्छुकांच्या मुलाखती व संघटनात्मक मोर्चे बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याची सध्यातरी स्पष्ट दिसत आहे.
यंदाचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने योग्य आणि स्वीकार्य चेहरा निवडण्यासाठी प्रत्येक पक्ष चाचपणी करताना दिसत आहे. पण सध्या तरी महायुती व महाविकास आघाडीचा युतीचा तिढा कायम असून इच्छुकांची स्थिती अजूनही संभ्रमावस्थेत आहे.
२०१६ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ८, शिवसेना ६, भाजपा २ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे १ नगरसेवक निवडून आले होते आता नव्या प्रभाग रचनेनुसार १० प्रभागातून २० नगरसेवकांसह थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार असून यावेळेस स्वीकृत सदस्य संख्या ३ राहणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आ. जवळगावकर यांनी काही दिवसापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीस सामोर जाताना कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असून या निवडणुकीत पूर्ण ताकदनिशी उतरणार असल्याचे सुतोवाच देखील करण्यात आला असून शहरातून सुनील सोनुले यांची निवडणूक रणनीती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची योगदान देखील निर्णायक ठरणार असून आ. जवळगावकर यांची सर्व समाजात असलेली प्रतिमा यावरून त्यांना कितपत फायदा होतो हे देखील निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
तर तिकडे विद्यमान आ.कोहळीकर यांनी सुद्धा पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतली असून यावेळेस पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडला होता.खा. सुभाष वानखेडे यांची भक्कम साथ आ.कोहळीकरांच्या पाठीमागे राहणार असून याचा कितपत फायदा या निवडणुकीत भेटणार याचा उलगडा येणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी निकालावरून स्पष्ट होणार आहे.
त्याचबरोबर शिवसेना (उबाटा गट), राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट), राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट), भाजपा,वंचित बहुजन आघाडी, एम आय एम यांच्यासह इतर पक्षांमार्फत निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार असून या पक्षांमार्फत सुद्धा उमेदवारांची चाचपणी मोठ्या वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे.तरी हदगाव शहरातील मतदार हे कोणाला साथ देतील याची मात्र उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.




















