सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव सोलापूर येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीच्या भक्कम पायाभरणीचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाण आणि जागरूकता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांप्रती दृढ निष्ठा व्यक्त केली. शिक्षकांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचे महत्व आणि नागरिक म्हणून प्रत्येकाने पाळावयाची कर्तव्ये या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित प्रभावी भाषणे, घोषवाक्ये आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून भारतीय लोकशाही परंपरेचे महत्व अधोरेखित केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमान, जागरूकता आणि जबाबदारीची भावना दृढ झाली.
संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्लास १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘उद्देशिका लेखन स्पर्धा’ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर हस्ताक्षर आणि आकर्षक मांडणीद्वारे उद्देशिका लिहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘फलक सजावट स्पर्धा’त भाग घेतला. संविधानातील मूल्यांवर आधारित संदेश, चित्रे आणि घोषवाक्यांचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण आणि भव्य सजावट सादर केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागातील शिक्षकांनी केले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाहीची ओळख असलेल्या संविधानाचे महत्व पुन्हा अधोरेखित केले आणि राष्ट्रनिष्ठेची नवी ऊर्जा अंगीकारली.























