तभा फ्लॅश न्यूज/किनवट : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच आलेल्या श्रावणसऱ्यांमुळे किनवट तालुक्यातील कोरड्या पडलेल्या शेतजमिनींना आणि सुकू लागलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही ठोस आणि जोरदार पावसाचा तालुक्याला अत्यंत आवश्यक असलेला लाभ झालेला नाही. नदीनाल्यांमध्ये पुरेसं पाणी वाहिलं नसल्याने भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास अद्याप वेळ लागणार आहे.
किनवट तालुक्यात पावसाने चांगलाच दडी मारल्यामुळे जवळपास ८० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्याच्या छायेत आली होती. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, भात यांसारख्या पिकांचे वाया जाण्याची वेळ आली होती. परंतु तालुक्यात काही भागांत रिमझिम, तर काही भागांत दमदार स्वरूपाचा पाऊस पडू लागल्याने सुकू लागलेल्या पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळाले आहे.
मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला, तर जूनमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेकांनी कसेबसे पेरण्यांचे काम उरकले. ग्रामीण भागात आखाडीची झड म्हणून प्रचलित असलेली आषाढी एकादशीदरम्यानही पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र श्रावण सरींनी त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. आता “नागपंचमी सणाच्या” सुमारास म्हणजे “पंचमीचा झड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला, तर पिकांची वाढ चांगली होऊन शेतकरी सुखावतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दिवसभर आकाश ढगाळ होते आणि हलकासा पाऊस अनेक भागांमध्ये सुरूच होता. यामुळे तापमानात घट झाली असून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यासच पिकांचा अपेक्षित विकास होऊ शकेल.
डोंगराळ भागातील मुरमाड जमिनीत पेरलेली पिके पाण्याअभावी वाळत चालली होती. काही भागांमध्ये तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा पर्याय स्वीकारावा लागला आहे. काळ्या सुपीक जमिनी भेगाळू लागल्याने पेरलेली बियाणे उगवलीच नाहीत किंवा उगवल्यानंतर सुकून गेली आहेत.
ज्यांच्याकडे काही प्रमाणात सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पिके तग धरून ठेवली असली तरी सतत कमी होत चाललेली पाणीपातळी ही चिंतेची बाब बनली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. यावर्षी मात्र स्थिती उलट असून शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. दमदार पावसाची नितांत आवश्यकता असून, पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.