तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना खासगी १७ नंबर फाॅर्म भरून परीक्षेला बसण्याची संधी दिली आहे. जे शाळेत जाऊ शकत नाहीत, नियमित शिक्षण घेऊ शकत नाहीत अथवा शिक्षण अर्धवट राहिलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आता त्यांना परीक्षेला बसण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
दहावी आणि बारावीसाठी नोंदणी शुल्क १ हजार ११० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये तसेच विलंब शुल्क १०० रुपये आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत ३१ ऑगस्ट आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिकृत शिक्षण मंडळाचे संकेतस्थळावर http://www.mahahsscboard.in वर ऑनलाइन नोंदणी करा. त्यापूर्वी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा द्यायची आहे. त्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घ्या.
संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नरवरील सूचनांची अंमलबजावणी करा. आवश्यक कागदपत्रे स्कॅनर, मोबाइलद्वारे पीडीएफ काढून अपलोड करा. दिलेल्या पत्त्यानुसार सर्व जिल्हा, तालुका निवडलेल्या माध्यमानुसार येणाऱ्या शाळांच्या यादीतून एका शाळेची निवड करावी लागणार आहे .