पंढरपूर – येथील यमाई तलावानजिक असणाऱ्या नगरपरिषदेच्या जागेवर बुध्द विहार उभारण्याच्या मागणीसाठी बुद्धभूमी निर्माण कृती समितीने येथील तहसील कचेरीसमोर उपोषण सुरु केले होते. दरम्यान या आंदोलनस्थळी मोहोळचे आमदार राजु खरे यांनी भेट देवून बुद्ध विहारासाठी प्रस्ताव तयार करून त्वरित शासनाची मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पंढरपूर येथील यमाई तलावानजिक असणाऱ्या नगरपरिषदेच्या जागेवर बुध्द विहार उभारण्याची बुद्धभूमी निर्माण कृती समितीची मागणी आहे. गेली चौदा वर्षापूर्वी सर्व सामाजिक संघटनांच्या मागणी नुसार पंढरपूर नगरपरिषदेने ठराव करून तसेच समितीकडून वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याने न्याय मिळत नसल्याने महाड चवदार तळे मुक्तिसंग्रामच्या ९९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुद्धविहार उभारण्याच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी त्वरित मिळावी या मागणीसाठी शुक्रवार (दि.२० ) पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बुद्धभूमी निर्माण कृती समितीचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, कार्याध्यक्ष दिपक चंदनशिवे, सचिव स्वप्निल गायकवाड, उपाध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष महेश मोटे, जनसंपर्कप्रमुख अमित कसबे यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मोहोळचे आमदार राजू खरे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी भेट देऊन मुख्याधिकारी, भूमिअभिलेख अधिकारी यांना संपर्क साधून परिस्थिती जाणून घेऊन बुद्ध विहार उभारण्याबाबत शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी सुनिल सर्वगोड, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष सर्वगोड, प्रशांत लोंढे, रवींद्र शेवडे, अमर फडतरे, दीपक साबळे, रुपेश वाघमारे, अर्जुन माने, एडवोकेट गौतम भालेराव, समाधान लोखंडे, राहुल सर्वगोड, लखन माने उपस्थित होते.

























