बार्शी – बार्शी शहरातील परांडा रोडवर आज (दि. ६ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास भरधाव मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला.
मृताचे नाव संजय मारुती अनभुले (वय ५५, रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) असे आहे.
फिर्यादी विजय मारुती अनभुले (वय ५३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतः महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे नोकरीस असून, दररोज सकाळी भाऊ संजय अनभुले व मावस चुलते भास्कर डिसले यांच्यासह बार्शी–परांडा रोडवर वॉकसाठी जात असतात. आजही पहाटे पाचच्या सुमारास तिघेजण वॉकसाठी गेले होते.
सकाळी सहा वाजताच्या दरम्यान परांडा रोडवरील पटेल यांच्या पॅरागॉन चप्पल शोरुमजवळ येताच, मागून भरधाव वेगात आलेल्या हिरो कंपनीच्या एच.एफ. डिलक्स ( एम एच १३ सी आर ८३६६) या मोटारसायकलने संजय अनभुले यांना जोरात धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर कोसळले.
विजय अनभुले व भास्कर डिसले यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून जगदाळे मामा हॉस्पिटल येथे नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून संजय अनभुले यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर नागरिकांनी मोटारसायकल व दोन्ही युवकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मोटारसायकल चालवणाऱ्या युवकाचे नाव लहू पवार (वय १९, रा. इंद्रानगर, पारशीक खारेगाव, ठाणे) असे असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

















