सोलापूर – शहरात यंदाच्या वर्षी दिल्लीच्या बंदुकीची धूम दिसून येत आहे. गतवर्षी देखील ही या बंदुकीने सोलापूरकरांमध्ये एक वेगळीच ओढ निर्माण केली होती. ती ओढ यावर्षी देखील कायम असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती सात रस्ता, नवी पेठ, रेल्वे स्टेशन, अशा विविध भागात बॉक्स भरून काडेपेटीने आवाज करणारी काळी भगवी बंदूक विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, दिल्ली आणि मुंबई येथून या बंदुकीची आवक झाली असून, इतर राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात या बंदुकीची विक्री करताना दिसत आहेत. गतवर्षी या बंदुकीची किंमत शंभर रुपये इतके होती. परंतु यंदाच्यावर्षी या बंदुकीच्या दरात वाढ झाली असून, ही बंदूक सुमारे १२० रुपयांपर्यंत विकली जात आहे. या बंदुकीसाठी रील किंवा टिकल्यांची आवश्यकता नाही. ही बंदूक मधोमध वाकवून त्यामध्ये असणाऱ्या एका छिद्रामध्ये काडेपेटीची काडी टाकल्यानंत बंदुकीचे ट्रिगर दाबल्यानंतर “ठो” असा मोठा आवाज येतो.

शहराच्या विविध चौकात युवक अशा मोठ्या प्रमाणात बंदूक वाजवून त्याची विक्री करताना दिसत आहेत. उत्सुकतेपोटी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हे नेमके काय चालले आहे, हे पाहिल्यानंतर ही बंदूक घेतल्याशिवाय राहत नाही. ही बंदूक घेतल्यानंतर मात्र यासाठी काडेपेटीचे काड्यांची आवश्यकता भासणार आहे. दिवाळीच्या हंगामात या बंदुकीची विक्री होते. त्यामुळे बंदूक घेण्यासाठी रस्त्यांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. काडेपेटीच्या सहाय्याने बंदूकीचा उपयोग होणार असल्याने ग्राहकांनी देखील बंदूक खरेदीकडे मोर्चा वळवलेला दिसत आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी ग्राहकांचा ओढा
नव्या पद्धतीची बंदूक दिल्ली येथून मागवली जाते. दिवाळी निमित्त या बंदुकीची क्रेझ आहे. गतवर्षी ही बंदूक मोठ्या प्रमाणात विक्री केली गेली. यावर्षी देखील बंदुकीला मागणी कायम आहे.
– सुनील कुमार, विक्रेते
नवीन बंदुकांची खरेदी
दिवाळीमध्ये बंदुकीची मागणी दिसत आहे. प्रत्येकांकडे बंदूक दिसून आली. म्हणून उत्सुकतेपोटी पाहण्यासाठी येथे आल्यानंतर काडेपेटीच्या काडीवर चालणाऱ्या बंदुका खरेदी केल्या आहेत.
– मंगेश काळे, ग्राहक