सोलापूर : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने संपूर्ण राज्य हादरले आहे. कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असताना, सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी आज हृदयाला चटका लावणाऱ्या ठरत आहेत.
शनिवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२४… दुपारची वेळ. सोलापूर महापालिका आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नेहमीप्रमाणेच ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्री झाली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली–उगले यांनी त्यांचे स्वागत केले होते. इंद्रभुवन इमारतीतील मीटिंग हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अजितदादांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. स्क्रीनवर सुरू असलेली सादरीकरणे बारकाईने पाहत, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी प्रश्न विचारले, सूचना केल्या. यानंतर त्यांनी सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या इंद्रभुवन इमारतीची चारही बाजूंनी प्रत्यक्ष पाहणी केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नूतनीकरणाकडे त्यांनी अत्यंत सूक्ष्म नजरेने लक्ष दिले. कुठेही मूळ वास्तुशैलीला धक्का बसू नये, याबाबत त्यांनी विशेष आग्रह धरला. काही लहानसहान त्रुटी निदर्शनास आणून देत, त्या दुरुस्त करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
“ इंद्रभूवन ही केवळ इमारत नाही, हा सोलापूरचा इतिहास आहे” अशा शब्दांत त्यांनी इंद्रभुवनच्या वारशाविषयीचा आपुलकीचा भाव व्यक्त केला होता. नूतनीकरणाचे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी महापालिकेच्या कामाचे मनापासून कौतुक केले होते. त्यावेळी आयुक्त शीतल तेली–उगले यांनी उपमुख्यमंत्री यांना इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाची सविस्तर माहिती दिली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा लाभलेली सोलापूर महापालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले होते. मूळ सौंदर्य अबाधित ठेवूनच हे नूतनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त आशिष लोकरे, तत्कालीन उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, माजी आमदार दीपक साळुंखे–पाटील, माजी गटनेते किसन जाधव, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
“मूळ सौंदर्य जपा” सांगणारा तो आवाज
कायमचा शांत झाला…
आज, त्याच इंद्रभुवनच्या दगडी भिंती, कमानी आणि ऐतिहासिक वास्तूत अजितदादा पवार यांच्या त्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. विकासाबरोबरच वारशाची जपणूक करणारा संवेदनशील नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, ही जाणीव सोलापूरकरांच्या मनात शोकभावना दाटून आणत आहेत.
इंद्रभुवन आजही उभे आहे… पण त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहणारी ती नजर, सूक्ष्म निरीक्षण करणारा तो अनुभव,
आणि “मूळ सौंदर्य जपा” सांगणारा तो आवाज
आज कायमचा शांत झाला आहे…अशा भावना व्यक्त होत आहेत.
अजितदादांकडे विकास अन् कलात्मक दूरदृष्टी होती : उपायुक्त लोकरे
इंद्रभुवन वास्तूच्या पाहणी वेळीच्या आठवणी सांगताना महापालिका उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर महापालिका आवारातील इंद्रभुवन या वास्तूची सूक्ष्म पाहणी केली होती. पूर्ण निरीक्षण केले होते. उत्कृष्ट वास्तू कशी असावी ? यांची अभ्यासपूर्ण माहिती अजितदादांना होती. त्याच माध्यमातून त्यांनी इंद्रभुवन वास्तू नूतनीकरणातील काही त्रुटीही सुचित केल्या होत्या. विविध विकास कामांचा आढावा घेत असतानाच त्यावेळी त्यांनी निधीची गरज असेल तर कधीही सांगा, मी मागे पडणार नाही. सोलापूर शहरातील विकास कामे मार्गी लागली पाहिजेत. उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करा. सोलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. अशा स्पष्ट सूचनाही अजितदादांनी त्यावेळी दिल्या होत्या, अशी भावनिक आठवणही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितली.

















