पंढरपूर – सद्गुरू जगन्नाथ बाबा भक्तगण मठ, श्री क्षेत्र गोपाळपूर येथे कार्तिक वारी निमित्ताने आयोजित संगीतमय श्रीमत् भागवत सप्ताह सोहळ्याची सुरुवात कार्तिक शुद्ध सप्तमी, बुधवार दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी घटस्थापनेने झाली. हा कार्यक्रम कार्तिक शुद्ध पौर्णिमा (पंधरावी) , बुधवार दि.५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भक्तिभावाने पार पडणार असून संपूर्ण परिसरात अध्यात्म, नामस्मरण आणि भजनरंग भरून राहिला आहे.
या भागवत सप्ताहाचे भागवतकार, प्रवचनकार व कीर्तनकार ह.भ.प. सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर (झिंगुजी वार्ड, भद्रावती, जि.चंद्रपूर) असून त्यांच्या रसाळ व भावस्पर्शी भागवत कथेमुळे भक्तजन मंत्रमुग्ध होत आहेत. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत कथा पार पडत असून, श्रोते मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून धर्मश्रवणाचा आनंद घेत आहेत.
सप्ताहात साथसंगत हार्मोनियम ह.भ.प.विलास डाखरे महाराज,गायक ह.भ.प.प्रकाश पिंपळकर महाराज, तबला वादक ह.भ.प.रोहीत चौधरी महाराज, ढोलक वादक ह.भ.प. आदित्य पिंपळकर महाराज तसेच टाळ वादक ह.भ.प. गजानन कींनाके महाराज व संच वादनाची सेवा बजावत आहेत.
दररोज पहाटे ५ ते सकाळी ६.३० या वेळेत काकडा भजन, तर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरीपाठ ह.भ.प. धनराज नागापूरे महाराज (मुरखेडा) व त्यांच्या संचाच्या सुमधुर गायनातून सादर केला जात आहे. रात्री ८ वाजता हरीकिर्तन कार्यक्रमही भाविकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा समारोप बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी ह भ प सौ सुवर्णाताई पिंपळकर यांच्या सुमधुर वाणीतून काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर घुगरी काला व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील भाविक, महिला मंडळी, तसेच दूरदूरवरून आलेले श्रद्धावान मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
सद्गुरू जगन्नाथ बाबा भक्तगण मठाच्या या धार्मिक उपक्रमामुळे गोपाळपूर परिसरात अध्यात्म, सेवा व भक्तीचा सुगंध दरवळत आहे. आयोजक मंडळाने सर्व भाविकांना दर्शन, नामस्मरण व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू जगन्नाथ बाबा भक्तगण मठाच्या आयोजक मंडळींनी केले आहे.

























