पुणे : शहरातील कल्याणीनगर परसरात झालेल्या अपघात प्रकरणामुळे सध्या पुणे केंद्रस्थानी आहे. त्यातच, पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबीयांस वाचविण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी व प्रशासकीय यंत्रणांनी केला होता. मात्र, याप्रकरणात पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनी आरोपींविरुद्ध बाजू लावून धरली, तर सोशल मीडियातूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यामुळे, पुणे प्रकरणात अग्रवाल कुटुंबातील आरोपींवर कारवाई होत आहे. त्यामुळे, सध्या रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते पुणे प्रकरणावर भाष्य करत आहेत. मात्र, आता आमदार धंगेकर यांनी केलेल्या एका ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यातील आयटी हबमधून 37 कंपन्यांचे स्थलांतर झाल्याचं आमदार धंगेकर यांनी म्हटलं आहे. मात्र, धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य आणि किती सत्य हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे शहरातील हिंजवडी परसिरात मोठं आयटी पार्क उभारण्यात आलं आहे. या आयटी पार्कमध्ये शेकडो आयटी कंपन्या कार्यरत असून हजारो आयटी इंजिनिअर्संना हक्काची नोकरी मिळाली आहे. या आयटी हबमुळे पुण्याच्या वैभवात मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण नोकरीसाठी पुण्यात येत आहेत. त्यामुळे, पुण्याचा आर्थिक विकास आणि नागरीकरण वाढीस लागलं आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात पुण्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे, साहजिकच पुण्याचा विस्तार आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीही वाढली आहे. मात्र, याच वाहतूक कोंडीचं कारण देत काही कंपन्या पुण्यातून स्थलांतरीत झाल्याचं आमदार धंगेकर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
योगेश जोशींनी दिलं स्पष्टीकरण
हिंजवडीच्या आयटी हब मधून 37 कंपन्या स्थलांतरित झाल्याची बातमी काही माध्यमांनी चालवली. याबाबत हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या योगेश जोशी यांच्याकडून माहिती घेतली असता, या कंपन्या कोरोना आणि त्या आधीच्या काळात स्थलांतरित झाल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडच्या काही महिन्यात एकही कंपनी पुण्यातील आयटी हबममधून स्थलांतरित झाली नसल्याची माहिती जोशी यांनी दिली. त्यामुळे, पुणे अपघात प्रकरण लावून धरणाऱ्या आणि पुण्यासाठी तळमळीने प्रश्न मांडणाऱ्या धंगेकरांनी ट्विटच्या माध्यमातून केलेल्या आरोपात किती तथ्य आणि किती सत्य आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
काय आहे धंगेकरांचे ट्विट
हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे. एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत, त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं. गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन -दोन तास लागायला लागलेत तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा दोन तीन तासाचा प्रवास होतोय. महापालिकेकडून पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी काम करण्याचं आव आणून नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाचे चौक, मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाणपूल,ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती.परंतु कोणीही या गोष्टींकडे पुढच्या 40-50 वर्षाचे नियोजन म्हणून पाहत नाही.
पोलिसांच्या वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
पोलिसांच्या वाहतूक विभागाचे देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होतंय.सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस ,वॉर्डन उपस्थित राहिलेच पाहिजे. सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री , पालकमंत्री व या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पाऊले उचलावीत.