पंढरपूर – येथील गोपाळपूर रस्त्यावरील अत्यंत प्राचिन अशा विष्णूपद मंदिर आणि परिसरात नियमित स्वच्छता राखण्याची गरज आहे. कारण धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे ठिकाण आहे. पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक जण विष्णूपद येथे दर्शनासाठी आवर्जून जात असतोच.
शिवाय मार्गशिर्ष महिन्यात संपुर्ण महिनाभर या मंदिरातच विठ्ठलाचे वास्तव्य असल्याची अख्यायिका सांगितली जाते. यावर्षी आता मार्गशिर्ष महिना संपत आलेला आहे. मात्र सध्या पाहिले तर या मंदिराच्या परिसरात घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. त्यामुळे या मंदिर परिसराकडे येथील नगरपालिका तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनी विशेष लक्ष देवून या ठिकाणी कायमस्वरुपी स्वच्छता राहिल, भरपूर उजेडाची सोय राहिल याची खबरदारी घेतली पाहिजे.
येथील चंद्रभागेच्या पात्रात असलेले विष्णूपद मंदिर हे एक प्राचिन मंदिर आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणारा प्रत्येक भाविक विष्णूपद मंदिराला भेट देत असतो. सध्या या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. चंद्रभागा नदी मध्ये बऱ्या पैकी पाणी असून देखील सगळीकडे शेवाळे साठलेले दिसत आहे. मंदिराच्या समोरील बाजूस चंद्रभागा नदीच्या पात्रात तसेच वाळवंटा मध्ये बेसुमार वाळू उपसा झालेला असल्यामुळे पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून त्याचा देखील भाविकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बरोबरच मंदिराच्या बाजूला नदीपात्राच्या कडेला बाभळी सारखी झाडे, झुडपे वाढलेली दिसत आहेत. ती देखील काढून मंदिराकडील चंद्रभागेचा तीर देखील स्वच्छ करण्याची गरज आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या मारुतीच्या कट्यावर देखील पाणी आहे. या पाण्यात देखील शेवाळे आणि बऱ्याच ठिकाणी आळ्या झाल्याचे सहजदृष्टीस पडत आहे. मारुतीच्या कट्यावर देखील पाण्यात द्रोण, फाटक्या कापडाच्या चिंध्या, उष्टे,खरकटे अन्न पडलेले सर्रास दिसत आहे.
मंदिर परिसरातील चंद्रभागेच्या पात्रातील पाण्याला सध्या अक्षरश: वास येऊ लागलेला आहे. पात्रात शेवाळ साठल्यामुळे नदीच्या पाण्यावर त्या शेवाळाचा थर जमा झालेला आहे. या मंदिर परिसरात असणाऱ्या हाँटेल, तसेच रसवंती गृहांच्या मालकांनी देखील मंदिर परिसरात घाणी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. चंद्रभागेच्या पात्राची देखील कायमस्वरुपी स्वच्छता राखली जावी. या बरोबरच मुख्य रस्त्यावरुन मंदिराकडे जाणाऱ्या नदी पात्रातील दगडी पूलाला कायमस्वरुपी बँरेकेटींग करण्यात यावे अशी देखील मागणी भाविकांमधून केली जात आहे.
—————————
मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदा ते मार्गशिर्ष वद्य अमावस्या या काळात येथील मंदिरात संपुर्ण महिनाभर विठुरायाचे वास्तव्य असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणी महिनाभर दररोज पहाटे व संध्याकाळी विठुरायाची आरती होत असते. या शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील येथे करण्यात येत असते. त्यामुळे पंढरपूर शहर तसेच आसपासच्या गावातील तसेच खास परगावाहून येणाऱ्या भाविकांची देखील या मंदिरात मोठी गर्दी असते. याच काळात नाताळ सुट्या असल्याने बाहेरगावच्या शाळांमधील विद्यार्थ्याच्या सहली देखील येथे येत असतात. यावर्षी मार्गशिर्ष महिना आता संपत आलेला आहे. या ठिकाणी संपुर्ण महिनाभर भाविकांची गर्दी झाल्यामुळे या परिसरात सगळीकडे उष्टे, खरकटे अन्न, खरकट्या पत्रावळी, द्रोण,प्लास्टिकचे ग्लास सगळीकडे पडलेले दिसतात. त्यामुळे या ठिकाणी जर नियमीत स्वच्छता राखली गेली तर आलेला भाविक समाधानाने या ठिकाणी दर्शन घेऊन विसावु शकेल अशी व्यवस्था पालिकेकडून येथे करण्यात यावी अशी मागणी देखील भाविकांमधुन केली जात आहे.
————————————
अशी आहे विष्णूपद मंदिराची अख्यायिका
चंद्रभागा पात्रातील विष्णूपद मंदिरात गायीच्या पावलांचे ठस्से , कृष्णाने राधा तसेच गायींसाठी वाजविलेली बासरी तसेच या ठिकाणी कृष्णाने आपल्या संवगड्यासह काला करुन खाल्लेली काल्याच्या वाटीच्या खुणा दगडा मध्ये कोरलेल्या दिसून येतात. या बरोबरच या ठिकाणी भगवान विष्णूची पावले देखील उमटलेली दिसतात. त्यामुळे या ठिकाणाला विष्णूपद असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
——————–
फोटोओळी : पंढरपूर : येथील अतिप्राचिन अशा चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या श्री विष्णूपद मंदिर परिसरात सगळीकडे सध्या घाणीचे साम्राज्य पसलेले दिसत आहे.


























