सांगोला – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांगोल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक वस्तू भेट देत महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यामध्ये दोन महिलांना शेळ्या, दोन महिलांना शिलाई मशीन तर एका महिलेला पिठाची गिरणी देण्यात आली. या वस्तूंच्या माध्यमातून संबंधित महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लागणार आहे. दत्तात्रय जाधव, ॲड.सारंग वांगीकर, दत्तात्रय खंडागळे यांच्या हस्ते लाभार्थींना या वस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी आपुलकी सदस्य शहाजी गडहिरे, ॲड.सारंग वांगीकर, दत्तात्रय खंडागळे यांनी मनोगतात हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले.
आभार सोमनाथ सपाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महिला तसेच प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करत प्रतिष्ठानने सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे.



















