अकलूज – येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांचेवतीने साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाचे ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार- २०२६’ चे वितरण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सहकार महर्षी विशेष जीवनगौरव पुरस्कार प्राचार्या आसावरी शिंदे कदम यांनी स्विकारला. ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारे प्रख्यात कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख यांना विशेष पुरस्कार व संवेदनशील कवी आणि लेखक नारायण सुमंत यांना साहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रोख रक्कम, सन्मानचिन्ह, फेटा, हार,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, पुरस्कार समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे, अँड.नितीन खराडे, ट्रस्टचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविकात स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, विजयदादांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पुन्हा वाचन संस्कृती रुजावी व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. हा या सोहळ्याचा उद्देश आहे.
कवि नारायण सुमंत म्हणाले, माझे बालपण संपन्न व समृध्द असणार्या अकलूजला गेले असल्याने साहित्यात व्यक्त होणारे सर्व प्रकार मला याच मातीतून मिळाले.माणूस संवेदनशील होत नाही तोपर्यंत तो समाजभिमुख होत नाही. शक्यतांचा शोध घेणे म्हणजे शिक्षण असल्याचे सांगून यावेळी त्यांनी बदलती शिक्षण पद्धती, निवडणुका, प्रचार यावर विडंबन गितेही सादर केली.
कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख म्हणाले, माझी आई आणि वडील व सभोवतालचा परिसर यामुळे माझ्यातील लेखक जन्माला आला. कलेचे माहेरघर असणाऱ्या अकलूज मध्ये सहकार महर्षींच्या नावे मिळालेला पुरस्कार हा आमच्यासाठी आनंद व प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रोहित देशमुख यांच्या कोलाहालाचे कोलाज या कविता संग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.
प्रा.आसावरी शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले. विनायक सूर्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले.आभार रोहित देशमुख यांनी मानले.


























