धाराशिव – कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे महात्मा फुले कला, वाणिज्य आणि सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड जिल्हा अमरावती व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, प्रमुख वक्ते मा. डॉ. राजेश मिरगे, मा. प्रा. डॉ. च त्रभुज कदम , कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद करडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. डॉ. राजेश मिरगे म्हणाले की डॉ. पंजाबराव देशमुख हे शेतकऱ्यांना अन्नदाता, मतदाता आणि धन निर्माता म्हणत. डॉ. पंजाबराव देशमुख यांची महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम ही प्रेरणास्थानी होती. त्यांनी नेहमी देव व दैववाद यांना अमान्य करून मानवतावादाचा पुरस्कार केला. तसेच धर्म हा माणसाच्या जगण्याची चौकट असली पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व महामानवांनी आयुष्यभर मानवी कल्याणासाठी काम केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे घटनेतील 340 व्या कलमा बाबत मोठे काम आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी तर आभार प्रा. डॉक्टर आनंद करडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























