पुणे: राज्यातील बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. 11 वर्षांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
सत्र न्यायालयात नेमकं काय घडलं?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर होत असल्याने त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल झाले. यानंतर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकाश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी कोर्टात दाखल झाले. आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हेदेखील यावेळी कोर्टात हजर होते. तर कोठडीत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयात आणण्यात आले.
पाचही आरोपी न्यायालयात आल्यानंतर न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी कामकाजाला सुरुवात केली. सर्वप्रथम न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी संजीव पुनाळेकर यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल वाचनाला सुरुवात केली. यावेळी न्यायमूर्तींनी पाच आरोपींपैकी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या विरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर संजीव पुनाळेकर ज्यांच्यावर आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप होता, त्यांनाही न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. तसेच आरोपी विक्रम भावे हेदेखील निर्दोष असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.
तर आरोपी क्रमांक दोन आणि तीन म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना खंडपीठाने कलम 302 आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास होईल, असे न्यायालयाकडून निकालपत्रात नमूद करण्यात आले.
डॉ. हमीद दाभोलकरांचे वकील काय म्हणाले?
डॉ. दाभोलकर प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोलकर यांचे वकील अभय नेवगी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अकरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त केली. या कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता आले नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश आहे. समाधान फक्त एवढं आहे की, ज्यांनी दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा मिळाली. पण कटाच्या मास्टरमाईंडपर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही. या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल मी अगोदरच नाराजी व्यक्त केली होती. दाभोलकर हे समाजसेवक होते, त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला. आम्ही याचे अनेक पुरावे सादर केले. आता निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींविरोधात आम्ही वरच्या न्यायालयात धाव घेणार आहोत, असे नेवगी यांनी सांगितले.