वेळापूर – माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावचे सुपुत्र डॉ. उमेश फडे यांची अतिरिक्त आयकर आयुक्त पदावरून पदोन्नती होऊन आयकर आयुक्त, पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे वेळापूरसह संपूर्ण मालशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. उमेश फडे हे वेळापूर येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत फडे यांचे सुपुत्र आहेत. सामाजिक बांधिलकी व सेवाभावी परंपरेचा वारसा लाभलेल्या कुटुंबातून त्यांनी शिक्षण व प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
डॉ. उमेश फडे यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा, वेळापूर येथे झाले. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण इंग्लिश स्कूल वेळापूर येथे पूर्ण केले. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून ग्रामीण भागातून शिक्षण घेत त्यांनी उच्च पदापर्यंत मजल मारल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.
पुणे येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ‘डॉ.’ ही पदवी संपादन केली. वैद्यकीय शिक्षणानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळत पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी (MPSC) परीक्षेत यश मिळवून उपअधीक्षक पोलिस (DySP) पदासाठी निवड मिळवली. प्रशिक्षणादरम्यानच त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली आणि जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेतही यश संपादन केले.
यानंतर त्यांनी आयकर विभागात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. मुंबई, अहमदाबाद आणि पुणे येथे त्यांनी महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि पारदर्शकता यांचा आदर्श ठेवला आहे.
सेवेच्या काळात त्यांची निवड संशोधन कार्यासाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथे करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे त्यांच्या कार्यकौशल्यात अधिक भर पडली.
डॉ. फडे हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी नेहमीच आपल्या कामात सचोटी राखून जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे वेलापूर गाव तसेच मालशिरस तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील जबाबदाऱ्यांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

























